माजी मंत्री अनिल राठोड अनंतात विलीन
सार्वमत

माजी मंत्री अनिल राठोड अनंतात विलीन

करोना संसर्गाची तमा न बाळगता हजारो चाहत्यांनी दिला अखेचा निरोप

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

शिवसेनेचा कडवा सैनिक, माजी मंत्री आणि विद्यमान उपनेते अनिल रामकिसन राठोड (वय 70) यांचे काल बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. करोना संसर्गाची तमा न बाळगता हजारो चाहते, समर्थकांनी गर्दी करत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

राठोड यांचे पार्थिव घेऊन हॉस्पिटलमधून निघालेल्या अ‍ॅम्ब्युलन्ससमोर दुचाकी रॅली काढण्यात आली. सर्जेपुरा, चितळे रोड, दिल्लीगेटमार्गे अमरधाममध्ये पार्थिव पोहोचले. आजारपणामुळे काही दिवसांपासून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. काल पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा विक्रम, तीन मुली असा परिवार आहे.

हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले राठोड हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. युती सरकारच्या काळात राज्यमंत्री पदाची जबाबदारीही त्यांना सांभाळली होती. राठोड हे 25 वर्षे नगर शहराचे आमदार होते. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायम तत्पर असत.

एका फोनवर ते सामान्यांचे प्रश्न सोडवित. प्रसंगी प्रशासनाला खडसावत. त्यामुळे मोबाईल आमदार ही बिरुदावली पहिल्यादांच त्यांना जोडली गेली.

पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले अनिल राठोड यांची कारर्किद नेता सुभाष चौकातून सुरू झाली. पावभाजी व ज्यूस सेंटरची गाडी चालविताना ते हिंदू एकता आंदोलन संघटनेशी जोडले गेले. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास सुरूवात केली. पुढे शिवसेनेने त्यांच्यावर नगर शहर शिवसेना प्रमुखाची जबाबदारी टाकली. तेव्हापासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते.

गेली 30-35 वर्ष नगर शहराच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या राठोड यांच्या निधनाने शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. सलग पाच वेळा त्यांनी विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व केले. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यात त्यांनी सिंहाचे योगदान दिले होते. शहराच्या राजकारणावर प्रचंड दबदबा असलेल्या राठोड यांची नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.

त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती कळल्यावर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शिवसेना व हिंदुत्वाशी कायम एकनिष्ठ राहत त्यांनी राजकारण, समाजकारण केले.

लॉकडाऊन काळात अन्नछत्र चालविले

2003 मध्ये जेव्हा नगर महापालिका स्थापन झाली, त्यावेळी या महापालिकेवर पहिला महापौर शिवसेनेचा झाला. यामध्ये राठोड यांचा मोठा वाटा होता. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर त्यामाध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात राठोड यांचा मोलाचा सहभाग होता. 1990 ते 2014 अशी सलग पंचवीस वर्ष आमदार असणार्‍या राठोड यांचा 2014 मध्ये पहिल्यांदा पराभव झाला. मात्र, त्यालाही न डगमगता त्यांनी त्यांनी पक्षाचे काम पुढे सातत्याने सुरू ठेवले होते. विशेष म्हणजे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊन काळात गरीब व गरजू नागरिकांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून राठोड यांनी अन्नछत्र सुरू केले होते. नगरमध्ये विविध भागात त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मदत पुरवली होती.

अन् आ. लंके यांना रडू कोसळले

स्व. अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. निलेश लंके यांना रडू कोसळले. राठोड यांच्या अंत्ययात्रेला नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. अंत्यसंस्कारानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादीचे आ. लंके यांना श्रध्दांजली वाहताना अश्रूृ अनावर झाले. यावेळी लंके म्हणाले, राठोड हे आमचे सर्वांचे दैवत होते. ती एक आगळीवेगळी शक्ती होती. त्यांच्या जाण्यामुळे आम्ही नगरकर पोरके झालो आहोत. नगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला ताकद देण्याचे काम त्यांनी केले. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना त्यांचे आशीर्वाद मला होते.

अनिल राठोड यांना मान्यवरांकडून आदरांजली

शिवसेनेचा बुलंद आवाज हरपल्याची व्यक्त केली भावना

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

दोन दशकाहून अधिक काळ नगर शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळख असणार्‍या अनिल राठोड यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांसह राजकीय व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली. गेली 25 वर्षांपासून नगरशहरातील मुलूखमैदानी तोफ थंडावल्याची भावना व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली.

नगर शहराचे 25 वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करताना माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आपल्या कामाचा राज्यभर ठसा उमटवला. धडाडी व आक्रमकते बरोबर त्यांनी विकास कामांना कायम प्राधान्य दिले. गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. शिवसेनेतील राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक अशी त्यांच्या नेतृत्वाची ओळख ठरली.

- ना. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. राठोड यांचे नगर जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव योगदान राहिलेले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने नगर शहरासह जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखात त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत.

- ना.शंकरराव गडाख, जलसंधारण मंत्री

जिल्ह्यातील एका अग्रगण्य व्यक्तिमत्त्वाने या जगाचा निरोप घेतला. उपनेते राठोड यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

- खा. डॉ. सुजय विखे पाटील

शिवसेनेचे नेते आणि अहमदनगर शहराचे माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. निष्ठावान शिवसैनिक व 25 वर्षे आमदार राहिलेल्या राठोड यांनी मंत्रिपदापर्यंत झेप घेतली होती.

- आमदार रोहित पवार

राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला. जनतेच्या प्रश्नावर अतिशय पोटतिडकीने भांडणारा, प्रसंगी संघर्ष करणारा नेता आपल्यातून गेला. अत्यंत लोकप्रिय असलेले अनिल राठोड यांच्या निधनाने कार्यतत्पर, लोकमानस जाणणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

- ना. हसन मुश्रीफ, पालकमंत्री

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत झालेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

- आ.राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणारे माजी मंत्री अनिलभैया राठोड यांचे निधन झाल्याची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तनपुरे कुटुंब राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

- ना. प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री

प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेले अनिल राठोड यांचे निधन वेदनादायी आहे. राजकीय विचार वेगळे असले तरी शहराचे नेतृत्व म्हणून त्यांचा नेहमीच आदर असायचा. त्यांच्या निधनाने राठोड कुटुंबियावर ओढलेले दु:ख मोठे आहे. सर्वांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी, हीच प्रार्थना.

- आमदार संग्राम जगताप

सामान्य कार्यकर्ता ते माजी मंत्री हा अनिल राठोड यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी ठरणार आहे. सातत्याने गोरगरिबांच्या प्रश्नासाठी त्यांनी आवाज उठवला. नगर शहरात व जिल्ह्यात शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख राहिली. त्यांच्या निधनाने जनसामान्यांचा बुलंद आवाज हरपला.

- आमदार सुधीर तांबे

शहरात अनिल राठोड यांनीच शिवसेनेला वाढवले. जनतेच्या साथीमुळे त्यांनी 5 वेळा शहराचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी हिंदुत्व कायम जपले. राम मंदिरासाठीही त्यांनी आंदोलन व संघर्ष केला होता. स्व.राठोड यांना भाजपच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

- माजी खासदार दिलीप गांधी

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. या दुःखात आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत. या दुःखातून सावरण्यास परमेश्वर त्यांच्या परिवारास ताकद देवो.

- बाबासाहेब वाकळे, महापौर अहमदनगर

अनिल राठोड हे सामान्य परिवारातून येऊनही नगर शहराचे 25 वर्षे आमदार राहिले. काही काळासाठी मंत्रीही राहिले. आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावान सैनिक राहिले. चांगला माणूस गेला.

- सत्यजित तांबे, युवक कॉग्रेस प्रदेशध्यक्ष

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी गेल्या 25 ते 30 वर्षे स्व. बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचे विचार शहरासह जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. एक-एक कार्यकर्ता घडविण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी सर्वसामान्यांना नगरसेवक, महापौर केले. त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम यापुढे आपल्याला करायचे आहे. तिच खरी स्व. राठोड यांना श्रद्धांजली ठरेल.

-प्रा. शशिकांत गाडे, दक्षिण जिल्हा प्रमुख

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com