चार कारखान्यांना गाळप परवाना

18 कारखान्यांचा अर्ज प्रलंबित : पारनेरच्या क्रांती शुगरचा अर्जच नाही
चार कारखान्यांना गाळप परवाना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा सरकारने घोषणा केल्यानूसार 15 ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार आहे. गाळप सुरू करण्यासाठी साखर संचालक यांचा गाळप परवाना आवश्यक असून जिल्ह्यातील 23 पैकी 22 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी ऑनलाईन अर्ज केला असून त्यापैकी चार साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. तर 18 काखान्यांचे गाळप परवाने प्रलंबित असल्याची माहिती नगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

यंदा जिल्ह्यात मुबलक उस असून यामुळे साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. तसेच साखरेला सध्या बरे भाव असल्याने साखर कारखानादारी रुळावर आहे. यंदा जिल्ह्यात गाळपासाठी 1 लाख 30 हजार 806 हेक्टरवर ऊस असून यामुळे कारखान्यांना पूर्ण क्षमतेने कारखाने चालवावे लागणार आहेत. गाळप परवाना मिळालेल्यामध्ये कोपरगावच्या कोल्हे, काळे, पाथर्डीच्या केदारेश्वर आणि जामखेडच्या जय श्रीराम कारखान्यांचा समावेश असून परवान्यांसाठी अर्ज केलेल्यामध्ये पाथर्डीचा वृध्देश्वर, श्रीगोंद्यातील कुकडी, श्रीगोंदा, साजन (साईकृपा 1), हिरडगाव (साईकृपा 2), सोनईचा मुळा, राहुरीचा प्रसाद आणि तनपुरे, भेंड्याचा ज्ञानेश्वर, संगमनेरचा थोरात, अकोल्याचा अगस्ती, श्रीरामपूरचा अशोक, लोणीचा विखे, गणेश, शेवगावचा गंगामाई, कर्जतचा अंबालिका, नगरचा पियुष, संगमनेरचा युटके यांचा समावेश आहे. यात पारनेरच्या क्रांती शूगरने अद्याप गाळप परवान्यांसाठी अर्ज केलेला नाही. हा कारखाना सध्या चांगलाच गाजत असून कारखान्यांच्या खरेदी विक्री व्यवहारावर आक्षेप घेण्यात आला असून त्याबद्दल थेट ईडीकडे तक्रार करण्यात आलेली आहे.

असे आहे ऊस

जिल्ह्यात 2021-22 मध्ये 1 लाख 30 हजार हेक्टरवर ऊसाचे क्षेत्र असून यात 26 हजार 115 हेक्टर आडसाली, 24 हजार 231 पूर्व हंगामी, 36 हजार 367 सुरू आणि 44 हजार 93 हेक्टर खोड हा ऊस आहे.

फक्त ऊस वाचला

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अधिकच्या पावसाने जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झालेले असून या अतिवृष्टीत ऊस पिकाने तग धरलेला आहे. जादाच्या पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले असून यामुळे पुढील वर्षी देखील मुबलक ऊस राहणार असल्याने कारखान्यांचा ऊसाचा प्रश्न मिटणार आहे.

Related Stories

No stories found.