माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या अडचणीत वाढ

औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात सुनावणी || विरोधकांनी गडाखांना घेरले
शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गौरी गडाख यांच्या आत्महत्येप्रकरणी 302, 120 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाची याचिका विनोद गजानन दळवी यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे. या याचिकेवर बुधवारी (दि.23) सुनावणी होण्याची शक्यता आहे.तत्कालीन मंत्री असतानाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी स्थानिक विरोधकांनी जंगजंग पछाडले होते.

प्रतिक काळे प्रकरणातही त्यांना गोवण्यासाठी मोठा प्रयत्न झाला होता. यामुळे आता न्यायालयात काय निर्णय लागणार यावर माजी मंत्री गडाख यांचे राजकीय भविष्य अवलंबून असल्याचे दिसत आहे. गडाख यांच्या विरोधात एका बड्या राजकीय पक्षाच्या राज्यपातळी वरील पदाधिकार्‍याने औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आहे.

या अर्जात म्हटले आहे, स्वर्गीय गौरी प्रशांत गडाख यांचा मृत्यू 7 नोव्हेंबर 2020 रोजी झाला. अशा बातम्या माध्यमातून आल्या. त्यांच्या मृत्यू संशयास्पद असून गौरी या घरातील सर्व गोष्टी बाहेर सांगत होत्या. त्याप्रमाणे त्यांनी बाहेर असे सांगितले, त्यांचे पती प्रशांत गडाख यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी बंधू म्हणजे शंकरराव गडाख यांना 50 कोटी रुपये उसने दिले होते. शंकरराव गडाख हे प्रशांत गडाख व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास देत होते.

मुळा एज्युकेशन सोसायटी व संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर कर असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यामुळे सगळे व्यवसाय वेगळे होते. परंतु मुळा एज्युकेशन संस्थेत जास्त पैसा मिळत होता म्हणून शंकरराव गडाख यांना तिथे हिस्सा पाहिजे होता. गौरी व प्रशांत गडाख यांचा संसार गोडीगुलाबीने सुरू होता. प्रशांत गडाख यांनी उसने दिलेले 50 कोटी रुपये शंकरराव यांना मागायला सुरुवात केली.

मात्र, शंकरराव गडाख यांनी हे पैसे देण्यास नकार दिला. प्रशांत गडाख यांच्याकडे संपत्ती राहू नये, अशी भावना शंकरराव गडाख यांची होती. यादरम्यान प्रशांत गडाख दारू प्यायला लागले, याचा फायदा घेऊन सुनीता गडाख या त्यांच्या दारूत विषारी घटक कालवायला लागल्या त्यामुळे प्रशांत गडाख यांची तब्येत बिघडत गेली व ते शारिरीक अनफिट झाले. त्यामुळे गौरी गडाख अस्वस्थ होत्या. गौरी गडाख यांना शंकरराव गडाख व सुनीता गडाख यांनी मारले. या सर्व गोष्टींमुळे प्रशांत व गौरी गडाख यांचा संसार उद्ध्वस्त झाला.

याबाबत माजी मंत्री गडाख यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, न्याय देवतेवर माझा भरवसा असून याबाबत मी काहीही बोलणार नाही. माझ्या विरोधात स्थानिक विरोधकांकडून कितीही कट कारस्थाने झाली, तरी सत्य काय आहे हे जनता जनार्धनला माहीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com