सत्ता असूनही विकासात कोल्हे गटाचे नगरसेवक नापास - आढाव

सत्ता असूनही विकासात कोल्हे गटाचे नगरसेवक नापास - आढाव

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव नगरपालिकेत मागील पाच वर्षात कोल्हे गटाच्या नगरसेवकांकडे बहुमत असतांना देखील विकास कामात राजकारण आणून शहरातील विकास होवू दिला नाही. त्यामुळे कोल्हे गटाच्या नगरसेवकांना बहुमत दिल्याचा नागरिकांना आता पश्चाताप होत असून सत्ता असून देखील विकासात कोल्हे गटाचे नगरसेवक नापास झाले असल्याचे माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे, कोपरगाव शहराच्या नागरीकांचा दैनंदिन वापर असलेल्या रस्त्यांचा तसेच इतरही 28 विकासकामांबाबत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी राजकारण आणून या विकासकामांना न्यायालयातून स्थगिती मिळवून शहराचा विकास लांबणीवर टाकला. त्याचा परिणाम शहरातील प्रत्येक प्रभागात विकासाचा कसा बोजवारा उडाला आहे. शहरातील नागरिक अनुभवत आहे सोसत आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोल्हे गटाचा नगरसेवक, या नगरेसवकाला उपनगराध्यक्षपद देखील भूषविले. मात्र या प्रभागात विकासाच्या बाबतीत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

मागील पाच वर्षात या प्रभागातील गटारींचा प्रश्न सुटलेला नाही. रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे जर उपनगराध्यक्ष पद भूषविलेल्या कोल्हे गटाच्या नगरसेवकाच्या प्रभागातील विकासाची अशी बोंबाबोंब असेल तर कोपरगाव शहराची देखील काय परिस्थिती असेल याची कल्पना येते. त्यामुळे ज्या विश्वासाने शहरातील जनतेने कोल्हे गटाच्या नगरसेवकांना कोपरगाव नगरपालिकेत बहुमत देवून सत्ता दिली ती सत्ता कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकासकामे करण्यासाठी न वापरता शहरविकासात आडकाठी घालण्यासाठी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा गेला असून याची किंमत त्यांना येणार्‍या निवडणुकीत मोजावी लागणार असल्याचे कृष्णा आढाव यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com