राहुरीतील वादात माजी मुख्यमंत्री व माजी पालकमंत्र्यांचीही उडी

दातीर हत्या प्रकरणात ‘ट्वीस्ट’; पोलीस निरीक्षकांकडून तपास घेतला काढून घेतला
राहुरीतील वादात माजी मुख्यमंत्री व माजी पालकमंत्र्यांचीही उडी

राहुरी (प्रतिनिधी) -

राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरणाला आता राजकीय ‘ट्वीस्ट’ आला आहे. या हत्याप्रकरणावरून आजी-माजी मंत्र्यांची जुगलबंदी सुरू झाली आहे. माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विद्यमान मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर या हत्याप्रकरणावरून शरसंधान साधले आहे.

तर ना.तनपुरे यांनीही याप्रकरणी कर्डिले यांना शह दिला आहे. आजीमाजी मंत्र्यांची जुंपलेली असतानाच माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनीही या आरोप-प्रत्यारोपाच्या आखाड्यात दंड थोपटून उडी मारली आहे. त्यातच, आता थेट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कर्डिले यांनी या वादात सामील करून घेतले असून ते दातीर कुटुंबाच्या सांत्वनासाठी राहुरीत येणार असल्याने या प्रकरणाला आणखी हवा मिळणार आहे

दरम्यान, या हत्या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ असलेला कान्हू गंगाराम मोरे व त्याचा साथीदार अद्यापही पसार असून त्यांना अटक करण्यास नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना अपयश आल्याने त्यांच्याकडून तपास काढून तो पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्याने हे हत्या प्रकरण आता कोणत्या वळणावर जाते? याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दातीर यांच्या हत्येनंतर माजीमंत्री कर्डिले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दातीर हत्येप्रकरणाशी ना.तनपुरे यांचा संबध असून चौकशी करण्याची मागणी केली. ना. तनपुरे यांनी कर्डिले यांच्या आरोपाचे खंडन केले. त्यानंतर काल दातीर कुटुंबाच्या भेटीला माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे राहुरीत आले. यावेळी त्यांच्या समवेत माजीमंत्री कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. राम शिंदे यांनी लगेच नगर येथे जाऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन तपासाला गती देण्याची मागणी केली आहे.

एकीकडे तालुक्याच्या राजकारणाच्या आखाड्यात राजकीय डाव रंगात आला असतानाच हत्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनातून काढून घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आता हा तपास थेट श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केल्याने राहुरी पोलीस खात्याच्या पदरी मोठी नामुष्की पडली आहे. दुधाळ हे याप्रकरणी तपास करण्यात अपयशी ठरले असल्याने त्यांची हवा वरिष्ठांनी काढून घेतल्याची चर्चा होत आहे.

राजकीय हेवेदावे

राहुरी तालुक्यात सध्या करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस शतकापार झळकू लागली आहे. तर बळींचीही संख्या वाढू लागली आहे. पोलीस, आरोग्य व महसूल प्रशासनाचा हलगर्जीपणा सुरू आहे. कोविड सेंटरमध्ये रूग्णांची मोठी आर्थिक पिळवणूक सुरू आहे. दाखल रूग्णांकडून उपचारापूर्वीच लाखो रुपये उकळले जात आहेत. कोविड सेंटरचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. ऑक्सिजन नाही, बेड शिल्लक नाही, रेमिडेसिवर इंजेक्शन शिल्लक नाही, करोना महामारीवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. मात्र, या समस्यांकडे दुर्लक्ष करून तालुक्यातील नेत्यांनी हत्या प्रकरणाचा योग्य तपासाऐवजी राजकीय हेवेदावे सुरू केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com