बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वनकर्मचाऱ्याचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वनकर्मचाऱ्याचा मृत्यू

श्रीरामपूर l प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागातील मोहटा देवी मंदिर परिसरात रविवारी धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करणा-या वनकर्मचारी लक्ष्मण गणपत किनकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये किनकर यांच्यासह सात जण जखमी झाले होते.

लक्ष्मण गणपत किंनकर हे वनकर्मचारी म्हणून राहुरी वनपरिक्षेत्रात कार्यरत होते. मोरगेवस्ती येथे एका ठिकाणी दडलेल्या बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात बिबट्याने किनकर यांच्यावर हल्ला करून त्यांच्या मांडीला चावा घेतला होता. सहकर्मचाऱ्याच्या प्रयत्नामुळे त्यावेळी बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. त्यांच्यावर अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू होते.

परंतु बिबट्याच्या चाव्यामुळे झालेला संसर्ग किनकर यांच्या शरीरात पसरला आणि त्यामुळे त्यांचा आज बुधवार दिनांक 8 डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली. लक्ष्मण गणपत किनकर यांना वनविभागातर्फे “वन शहीद”म्हणून गणण्यात आले आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com