वन विभागाच्या परवानगीविनाच जाळे आणि सापळे लावण्याचे प्रकार
सार्वमत

वन विभागाच्या परवानगीविनाच जाळे आणि सापळे लावण्याचे प्रकार

Arvind Arkhade

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यात वन्यजीव आणि वनपरिक्षेत्र प्रादेशिक विभागाच्या ताब्यात बहुतांशी वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. बिबटे, तरस लांडगे, कोल्हे, हरिण आदी प्राणी आढळतात; मात्र अनेक ठिकाणी रानडुकरेही त्रास देत असताना या उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परस्परच जाळे आणि सापळे लावले जात असल्याचे उघड झाले आहे. वन विभागाच्या परवानगीशिवाय असे जाळे लावले जात आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव मध्ये 15 दिवसांपूर्वी राष्ट्रीय पक्षी मोर आणि हरणाची खुलेआम शिकार करून मटण विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.

तालुक्यातील घोड, भीमा आणि हंगा नदीच्याकाठी वन हद्दीत खुलेआम वाळू तस्करी होत आहे. अनेक वेळा वनक्षेत्रात वाळू काढली जाते आहे.जंगलातून रस्ते तयार केले जातात; तर अनेक ठिकाणी वनक्षेत्रात अतिक्रमण होण्याचे प्रकार वाढले असल्याने अनेक वन्यप्राणी सैरभैर झाले असून त्यांचा वावर नागरी वस्तीच्या परिसरात व्हायला लागला आहे.

तालुक्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने घोड, भीमा नदीच्या काठच्या उसाच्या शेतात बिबट्याचा वावर वाढला आहे. उक्कडगाव, राजापूर, बेलवंडी, काष्टी, सांगवी बरोबरच कोथूळ, ढोरजा परिसरात बिबट्या आढळले आहेत. काही ठिकाणी वन विभागाच्या पिंजर्‍यात बिबटे अडकले आहेत.

मात्र दोनच दिवसांपूर्वी राजापूर परिसरात उसाच्या शेतात रानडुकरे त्रास देत असल्याने लावलेल्या जाळ्यात साडेतीन वर्षांचा बिबट्या अडकल्याने वनविभागापेक्षा रानडुकरे पकडायला लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला असल्याचे दिसून आले.

Deshdoot
www.deshdoot.com