
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा वन्यजीव विभागाने तालुक्यातील भानगाव परिसरात यंदाच्या उन्हाळ्यात केलेले 28 लाख रुपयांचे पाझर तलाव एकाच पावसाने वाहून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. दुसरकीडे पाझर तलाव वाहून गेल्याने आसपासच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
भानगाव येथे वन्य जीव विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचा 28 लाख रुपयांचा 7 पाझर तलावांसाठी निधी मिळाला होता. वन्यजीव विभाग गट नंबर 528 मध्ये गावातील काही भागात जमिनीत पाणी मुरावे यासाठी काम करण्यात आले होते. आघाव वस्तीजवळ शासनाने भविष्यात होणारी पाणी टंचाई दूर व्हावी या हेतूने हा निधी दिला. परंतु कामाची निविदा निघाल्यानंतर ठेकेदार आणि अधिकारी यांनी मिळून मलिदा खाल्ला आणि तो खाल्लेला मलिदा शेतकर्यांच्या मुळावर आला असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे.
पहिल्याच पावसात 28 लाख रुपयांचे काम पाण्यात वाहून गेले. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले पाहिजे झालेले नुकसान भरून मिळाले पाहिजे. तालुक्यात टाकळी, तांदळी, शेडगाव या ठिकाणी झालेली कामे देखील अशाच पद्धतीने निकृष्ट झाली आणि जवळपास चार कोटी रुपयांचा शासनाचा निधी असताना कामे गुणवत्तापूर्ण झाली नसल्याने या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भानगाव, टाकळी, तांदळी शेडगाव याठिकाणी झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करावी. भानगाव येथील तलाव फुटल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. नुकसाभरपाई देण्यात यावी. ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष शरद कुदांडे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.