जबरी चोरी करणार्‍यास तीन वर्षांची शिक्षा

जिल्हा न्यायालयाचा निकाल || पाथर्डी तालुक्यातील घटना
जबरी चोरी करणार्‍यास तीन वर्षांची शिक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पती-पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करून सोन्याचे दागिने लुटणार्‍या टोळीतील उमेश उर्फ किसन रमेश उर्फ रोशन भोसले (वय 24 रा. साकेगाव, ता. पाथर्डी) यास जबरी चोरी केल्याबद्दल तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी ठोठावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजेश त्रिमुखे यांनी काम पाहिले.

शांताबाई गोपीनाथ भावले (रा. अपूर्वा पेट्रोलपंपासमोर, करंजी, ता. पाथर्डी) हे कुटुंबासमवेत 5 नोव्हेंबर 2021 रोजी झोपलेले होते. चोरटे रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी आले. काळे कपडे घातलेल्या चोरट्याने त्यांच्या कपाळावर, डाव्या पायाच्या गुडघ्यावर व उजव्या हाताच्या खांद्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील दोन पळ्या असलेली पोत व मंगळसूत्र जबरदस्तीने तोडून घेतले. त्यांच्या पतीच्या डोक्यावर, तोंडावर, डोळ्यांवर व पायावर मारहाण करत गंभीर दुखापत केली. त्यांनी आरडाओरडा केला असता, मुलगा व इतर लोक मदतीसाठी आले.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात 10 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी अतिशय महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास साठे आणि पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com