ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरसाठी होणार सीएनजीचा वापर

साखर उद्योगाचा पुढाकार; नोव्हेंबरपासून ‘नॅचरल शुगर’ उत्पादन करुन करणार प्रत्यक्ष वापर
ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरसाठी होणार सीएनजीचा वापर

नेवासा | सुखदेव फुलारी|Newasa

नॅचरल शुगर या साखर कारखान्याने यावर्षीच्या गाळप हंगामापासून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर्ससाठी बायो-सीएनजी किट उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून हा कारखाना येत्या 1 नोव्हेंबरपासून साखरेबरोबरच बायोसीएनजी गॅसचे उत्पादनही सुरु करणार आहे.

मालवाहू व प्रवासी वाहनात पेट्रोल (गॅसोलीन) किंवा डिझेल याऐवजी सीएनजी वापरता येतो. कारण पेट्रोल वा डीझेल यांचा हा स्वस्त, अधिक कार्यक्षम व अधिक पर्यावरणस्नेही पर्याय असल्याने इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी राज्यातील साखर उद्योगाने पुढाकार घेऊन ऊस वहातूक करणार्‍या ट्रॅक्टर्स साठी डिझेल ऐवजी बायो सीएनजी गॅस वापरासाठी पुढाकार घेतला आहे.

ऊस वाहतूक करणारे वाहनात (ट्रॅक्टर) सीएनजीचे परिवर्तन वा रूपांतर करणारे साधन (किट) किंवा सीएनजी इंजिन बसविले जाते. अशा वाहनाच्या टाकीत 15 लिटर पेट्रोलशी तुल्य एवढा सीएनजी भरता येतो.

सीएनजी 20-25 बार म्हणजेच प्रती चौ.मी.ला 25,000 किलोटन दाब देऊन टाकीत भरतात आणि वाहनासाठी इंधन म्हणून वापरतात. या दाबामुळे त्याचा आकार 25 पटीने कमी होतो. सीएनजी हा कोरडा म्हणजे बाष्प नसलेला वायू असल्याने त्याचे ज्वलन होताना कमी बाष्प निर्मिती होते. त्यामुळे त्याची ज्वलनक्षमता वाढते. सीएनजी गॅस पर्यावरणस्नेही असून हे वाहनांचे सर्वांत स्वच्छ इंधन आहे. यात कार्बनचे प्रमाण कमी आहे. याच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड यांसारखे हरितगृह वायू व इतर प्रदूषके कमी प्रमाणात निर्माण होतात. तसेच वाहनाच्या धुराड्यातून बाहेर पडणार्‍या घातक वायूंचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे पेट्रोल व डिझेलपेक्षा सीएनजीच्या ज्वलनाने कमी प्रदूषण होते.

डिझेल-पेट्रोल या इंधनाला पर्याय देण्यासाठी साखर उद्योग सातत्याने नवनवीन प्रकल्प हाती घेत आहेत. साखर उद्योग निर्मिती करत असलेला इथेनॉल हा पेट्रोलला एक सक्षम पर्याय ठरला आहे.तर डिझेल-पेट्रोल बचतीसाठी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रॉनिक, सीएनजी-बायो-सीएनजी वर चालणारी वाहने आलीत.

प्रत्येक हंगामात साखर कारखान्यात लाखो मेट्रिक टन ऊस वाहतुकीसाठी लाखो लिटर डिझेल वापरले जाते. त्यातून हवेचे प्रदूषणही वाढते.

त्यामुळे डिझेलला पर्याय म्हणून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला गॅस किट बसवून बायो-सीएनजी गॅसचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे(इस्मा) अध्यक्ष कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी पुढाकार घेऊन त्यांचे नॅचरल शुगर या साखर कारखान्यामार्फत कारखान्याकडे गाळपास येत असलेल्या ऊसापासून साखर निर्मिती बरोबरच बायो-सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी हाती घेतलेली असून प्रत्यक्ष बायो-सीएनजी गॅसचे उत्पादन व विक्री नोव्हेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. यामुळे डिझेलच्या दरलवाढीस पर्याय म्हणून बायो-सीएनजी अत्यंत वाजवीदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नॅचरल शुगर या साखर कारखान्याचे माध्यमातून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांच्या व ऊस वाहतूकीसाठी कारखान्याकडे रितसर करार केलेल्या सन 2010 पासून पुढे उत्पादीत झालेल्या ट्रॅक्टर्ससाठी बायो-सीएनजी गॅस किट योग्य दरात उपलब्ध करून देण्याचे धोरण कारखाना व्यवस्थापनाने ठरविले आहे. राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यानी असा निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यास डिझेल बचत व पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com