श्रीरामपूर जिल्ह्यासाठी एकत्रित लढ्याची गरज - थोरात

श्रीरामपूर जिल्ह्यासाठी एकत्रित लढ्याची गरज - थोरात

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासाठी गेली कित्येक वर्षा पासून नागरिकांसह जिल्हा कृती समितीचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीरामपूरमध्ये अनेक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मध्यवर्ती ठिकाण असल्याने नगर जिल्ह्याचे विभाजन झाले तर श्रीरामपूर जिल्हा होणे हेच सर्वांच्या हिताचे आहे. मात्र, विद्यमान महसूल मंत्री स्वतःच्या संगमनेर तालुक्यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून घेऊन संगमनेर जिल्हा बनविण्याचा डाव खेळत आहेत की काय? अशी शंका रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी व्यक्त केली आहे.

हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करुन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी लढा उभा करणार असल्याचा निर्धार थोरात यांनी व्यक्त केला आहे. थोरात यांनी सांगितले, गेली अनेक वर्ष नगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. नगर जिल्ह्याची सध्याची भौगोलिक परिस्थिती बघता श्रीरामपूर जिल्हा झाला तर राहुरी, नेवासा, कोपरगाव, राहाता, संगमनेर आदी तालुक्यांना मध्यवर्ती ठिकाण म्हणून श्रीरामपूर हे सोयीचे होणार आहे.

राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय गोविंदराव आदिक, श्रीरामपूरचे माजी आमदार व दिवंगत काँग्रेस नेते जयंतराव ससाणे हे आमदार असताना तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासाठी श्रीरामपूरमध्ये भव्य प्रशासकीय इमारती उभारल्या. त्याचबरोबर जिल्हा होण्यासाठी आवश्यक सुविधा करायच्या असतील तर शेती महामंडळाची शेकडो एकर जमीन सरकारी कार्यालये, शासकीय कर्मचार्‍यांच्या निवासस्थानासाठी उपलब्ध आहे. जिल्हा होण्यासाठी ज्या ज्या सुविधा हव्या असतात, त्या सुविधा श्रीरामपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्व. जयंत ससाणे यांच्या दूरदृष्टीपणामुळे उपलब्ध झाल्या आहेत.

श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. त्याचबरोबर सर्वपक्षीय नेत्यांनी या लढ्यामध्ये साथ द्यावी, असे आवाहन श्री. थोरात यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.

Related Stories

No stories found.