कारागृहातील कैद्यांसाठी कोव्हिड सेंटर

महासैनिक लॉन्स येथे केली व्यवस्था
कारागृहातील कैद्यांसाठी कोव्हिड सेंटर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कारागृहातील करोनाबाधित कैद्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महासैनिक लॉन येथे खास कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोव्हिड सेंटरची उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे. तात्पुरते कारागृह व कोव्हिड सेंटर, असे त्याचे स्वरूप आहे.

कारागृहातील अनेक कैद्यांना करोनाची बाधा झाली असल्याने स्वतंत्र कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तेथे या कैद्यांवर वैद्यकीय उपचार केले जाणार आहे. शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या सेंटरच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित उपस्थित होते. जिल्ह्यातील कैद्यांना करोना उपचार मिळावे यासाठी एकाच ठिकाणी हे कोव्हिड सेंटर उभे करण्यात आले आहे. खास कैद्यांसाठी कोव्हिड सेंटर करण्यात आल्याने त्याचा फायदा होणार आहे.

उपचार वेळेवर मिळणार असून यामुळे पोलिसांवर होणारा ताण कमी होणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणारे कैदी एकत्र करणे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करणे गरजेचे होते म्हणून नगरच्या मध्यवर्ती ठिकाणी हे सेंटर केले आहे. 80 जणांची व्यवस्था व त्यांच्यावर उपचार येथे करून योग्य ती सुरक्षाही येथे देता येणार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले कैदी कारागृहात ठेवले जातात.

कारागृहात जागा कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त जणांना तेथे ठेवावे लागते. आजारी कैद्यांचा संसर्ग इतरांना होतो. तसेच आजारी कैद्यांना रूग्णालयांत ठेवले गेले तरी तेथे त्यांच्यासाठी बंदोबस्त लावावा लागतो. तसेच कोठडीत असलेल्या कैद्यांमुळे अन्य कैद्यांना व पोलिसांनाही बाधा होण्याची भिती असते, म्हणून आता कैद्यांसाठी स्वतंत्र कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com