बोठेच्या अटकेसाठी उपोषणाचा इशारा

ऋणाला जरे यांचे एसपींना पत्र
बोठेच्या अटकेसाठी उपोषणाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे 75 दिवसांनंतरही पोलिसांना सापडत नाही. त्याला अटक होईल का? कधी होणार? आणि त्याच्यावर कडक कारवाई होईल का? असे प्रश्न विचारत आईला न्याय मिळवून देण्यासाठी ऋणाल जरे यांनी एसपी कार्यालयासमोरच उपोषणाचा इशारा दिला आहे. तसे पत्र त्यांनी एसपी मनोज पाटील यांना आज दिले.

30 नोव्हेंबरच्या रात्री पुणे हायवेवरील जातेगाव घाटात रेखा जरे पाटील यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलिसांनी पाच जणांना अटक केल्यानंतर हत्याकांडाचा सूत्रधार बाळ बोठे असल्याचे समोर आले. मात्र 75 दिवस उलटल्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

रेखा जरे यांचा मुलगा ऋणाल यांनी आज एसपींना पत्र देत पोलिसांविषयीच शंका उपस्थित केल्या आहेत. बोठे हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणा काय करते? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. एखाद्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी एलसीबी यंत्रणा कामाला लावतात, त्या गुन्ह्यातील आरोपी आणि बोठे यात वेगळेपणा आहे का? असा प्रश्न करतानाच सीआयडी चौकशीची गरज तर भासणार नाही ना, अशी विचारणा त्यांनी केली आहे. आईला न्याय मिळण्याकरीता उपोषण हाच एकमेव पर्याय असल्याचे ऋणाल जरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

.................................

मंत्र्यांना निवेदन दिले पण..

75 दिवस उलटून गेले तरी बोठे अजून पोलिसांना सापडत नाही. चार्जशीट दाखल करण्याची तयारी सुरू झाली. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदारांना निवेदन दिले. तरीही बोठे सापडला नाही. सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लावल्याचे टीव्हीवर पोहतो, मग आमच्याच केसमध्ये असे का घडते? असा सवाल करत जरे यांनी बोठे हा सेशन, हायकोर्टात हितचिंतकामार्फत वकिलपत्रावर सह्या पाठवतो, तरीही तो पोलिसांना मिळत नाही. त्याअर्थी पोलीस यंत्रणा कमी पडली का? असा प्रश्न ऋणाल जरे यांना पडला आहे.

.................................

मुख्यमंत्री, अण्णांनाही पाठविले पत्र

ऋणाला जरे यांनी उपोषणाचा इशारा देणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कलेक्टर आणि डीआयजींना पाठविले आहे. हितचिंतक आणि कुटुंबियांसमवेत एसपी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com