धक्कादायक! उपवासाची भगर खाल्ल्याने ४०० हून अधिक नागरिकांना विषबाधा

धक्कादायक! उपवासाची भगर खाल्ल्याने ४०० हून अधिक नागरिकांना विषबाधा

वैजापूर | प्रतिनिधी

आ. रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी विविध रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांची चौकशी करीत असून, त्यांनी लोकांना भगर न खाण्याचे आवाहन केले आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान बहुतेक भक्त-भाविक नऊ दिवसांचा उपवास पाळतात. उपवासादरम्यान साबुदाणा अथवा भगरेचा आहार अनेकजण घेतात. मात्र हीच भगर अनेकांच्या जीवावर बेतली. सोमवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जणांना उपवास असतो. कालही अनेकांनी उपवासाचा पदार्थ म्हणून भगर शिजवून खाल्ली. संध्याकाळी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातून भगरीतून विषबाधा झाल्याची बातमी आली.

त्यानंतर काही वेळातच वैजापूर तालुक्यात देखील असाच प्रकार समोर आल्याने हाहाकार उडाला. भगर खाल्ल्यानंतर अनेकांना अंगाला थरथरी सुटू लागली. चक्कर येऊ लागली. अंग गळून गेल्यासारखे होऊ लागले. मळमळ होऊ लागली. अचानक उलट्या सुरु झाल्या. या उलट्या थांबत नसल्याने जो-तो दवाखाना जवळ करू लागला. एकएक करीत सगळेच दवाखान्यात येऊ लागल्याने तालुक्यातील सर्वच दवाखाने काही वेळातच फुल झाले. वैजापूर तालुक्यातील कापूस वाडगाव, विरगाव, टेंभी, लासुर, जरूळ, खंडाळा, वांजरगाव यासह बहुतेक सर्वच गावांत हा प्रकार घडला. या सर्वच ठिकाणच्या सरकारी दवाखान्यांसह खासगी रुग्णालये देखील रुग्णांनी भरले असून, अनेक रुग्णालयांत रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया आजही सुरु असल्याने अधिकच्या खाटा टाकण्याची वेळ आल्याचे समजते.

सध्याच्या घडीला वैजापूरच्या सरकारी दवाखान्यात ६० पेक्षा अधिक, तर लाडगाव रोडवरील श्री साई क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये तीस रुग्ण भरती आहेत. याशिवाय तालुक्यात बहुतांश सर्वच गावातील रुग्णालयात रुग्ण भरती असल्याने रुग्णांचा आकडा काही शेकड्यांमध्ये असण्याची शक्यता आहे. रुग्णालयांत दाखल रुग्णांपैकी अनेकांना उपचारानंतर बरे वाटू लागले असले तरी अनेकांच्या उलट्या थांबत नसल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सध्या सर्वच रुग्णालयातील डॉक्टर्स परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. सध्या शहरासह तालुक्यातील विविध रुग्णालयांत अनेक लोक भरती आहेत. मी अनेक रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णांची चौकशी करून आढावा घेतला. सध्या परिस्थिती आटोक्यात असून, डॉक्टर्स परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांवर उपचार सुरु आहेत. पण सध्या उपवासाचे दिवस असले तरी लोकांनी भगर खाणे टाळावे.

प्रा. रमेश बोरनारे (आमदार, वैजापूर)

वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भगर खाल्ल्याने महिला व नागरिक यांना विषबाधा झाली आहे अन्न व औषधी विभागाला आदेश देऊन वीज बातेचे कारण काय आहे भगर ही कोणत्या कंपनीची आहे तात्काळ चौकशी करून संबंधित भगर विकणारी कंपनी व डीलर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी

डॉ दिनेश परदेशी माजी, नगराध्यक्ष

उपवासामुळे सोमवारी नवरात्राच्या पहिल्या दिवशी अनेकांनी भगरीचे सेवन केले. त्यातून त्यांना विषबाधा झाली. अंगाला थरथरी सुटणे, मळमळ, उलट्या होऊ लागल्या. अनेक रुग्णांमध्ये उलट्याचे प्रमाण अधिक आहे. सध्याच्या घडीला आमच्या रुग्णालयात सुमारे तीस रुग्ण भरती असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बहुतेक रुग्णांना बरे वाटत असून, काही जणांच्या उलट्या मात्र अजूनही थांबलेल्या नाहीत. याआधी गेल्यावर्षी जालन्यात असा प्रकार घडला होता.

डॉ. नितीन बोरनारे (संचालक, श्री साई क्रिटिकल केअर हॉस्पिटल, वैजापूर)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com