
शिर्डी । शहर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अनकाई किल्यावरील शेकडोंच्या संख्येने भुकेने व्याकूळ असलेल्या वानरांना शिर्डी ग्रामस्थांच्या देणगीतून दोन महिने पुरेल एवढे खाद्य पुरविण्यात आले असल्याची माहिती श्री क्षेत्र अनकाई येथील महंत लालबाबा यांनी दिली असून श्री साईबाबांचा मनुष्य प्राणीमात्रांना अन्नदानाचा वसा शिर्डीकरांनी सुरू ठेवला असल्याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान अनकाई किल्ल्यावर असलेल्या वानरांना दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात झाडांची पाने, फळे तसेच खाद्यपदार्थ आदींचा खाण्यासाठी तुटवडा भासत असतो. उन्हाळ्यात किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांची संख्या देखील तुरळक असते. त्यामुळे अशा परिस्थितीत या वानरांची भुक कशी भागवायची हा मोठा प्रश्न महंत लालबाबा आणी त्यांच्या सहकाऱ्यांना पडतो. सदरची अडचण शिर्डी ग्रामस्थ तथा शिवसेना नेते कमलाकर कोते यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात आवाहन केले होते.
श्री साईबाबांच्या अन्नदानाचा वसा जपण्यासाठी या आवाहानास शिर्डी ग्रामस्थ आणी साईभक्तांनी प्रतिसाद देत मागील दोन ते चार वर्षांपासून या वानरासांठी देणगी जमा करून खाद्य पुरवले जात आहे. यंदाच्या वर्षी देखील महंत लालबाबा यांनी कमलाकर कोते यांच्याकडे या वानरांना खाद्यपदार्थ पुरविण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यानुसार शिर्डी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आणी आपल्या स्वेच्छेने देणगी जमा केली. यामध्ये एकोणचाळीस हजार रुपये इतकी देणगी जमा झाली असून या देणगीतून साधारणपणे दोन महिने पुरेल एवढे चने तसेच फळे अनकाई किल्ल्यावर पाठविण्यात आली असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले आहे.
तसेच त्यानंतरही आवश्यकता असल्यास शिर्डीकर मदतीला धावून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ऐतिहासिक अनकाई किल्ल्यावर ऋषी अगस्ती यांनी तपश्चर्या केली आहे. तसेच प्रभू श्रीराम वनवासात असतांना याठिकाणी आले असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.मुक्या प्राण्यांच्या चा-यासाठी अनेक संस्था तसेच दानशूर मंडळी पुढे येत असतात परंतु प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र अनकाई येथील भुकेल्या वानरांंसाठी शिर्डीतून अन्नाची मागणी करण्यात आली हे शिर्डीकरांचे भाग्य असल्याचे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे.
अनकाई किल्ल्यावर खाद्य पोहचविण्यासाठी शिर्डी शहरातील अतुल कोते, विराज गोंदकर, पंकज क्षिरसागर, प्रतिकेश नागरे, मंगेश जाधव, अमोल महाले, प्रकाश गोंदकर, साहिल शेख ,अभिषेक पवार, माऊली तुवर, अतुल दोडके, आदित्य कोते आदीनी परिश्रम घेतले. वानरांना खाद्य देतांना त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.