अन्न महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात धान्य वितरणाचा बोजवारा

जानेवारी उजाडला तरी चार वेळचे धान्यवाटप राहिले; दुकानदारांना सहन करावा लागतोय जनतेचा रोष
अन्न महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात धान्य वितरणाचा बोजवारा

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील धान्य वितरणचा बोजवारा उडाला आहे.

केंद्रशासनाची गरिबांकरिता असलेली अन्न सुरक्षा योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या योजनेचे धान्य पॉस मशीनवर कार्डधारकांचा अंगठा घेऊन दिले जाते.

सध्या करोनाचे पार्श्वभूमीमुळे महिन्यात विकत 2 रु. व 3 रुपये किलोने प्रति मानसी 5 किलो व तितकेच मोफत धान्य वाटप केले जाते. त्याची अंमलबजावणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेमार्फत होत आहे. परंतु गेल्या जुलै 2021 पासून धान्य वितरणाचा उत्तर नगर जिल्ह्यात बोजवारा उडालेला असून तालुका गोडावूनला वेळेत धान्य पोहचले नाही त्यामुळे गरिबांना धान्य मिळालेले नसून त्यांना या धान्यापासून वंचित ठेवले गेले आहे.

याबाबत माहिती घेतली असता, तालुक्यातील गोडाऊनला धान्यपुरवठा डीओ नगर ऐवजी श्रीरामपूर येथील खासगी असलेल्या एफसीआयच्या गोडाऊनमधून केला जात आहे. त्या ठिकाणी फक्त 25 हमाल आहेत. त्यामुळे ट्रकमध्ये धान्य भरण्यासाठी वेळ जास्त लागतो. गेले 62 दिवसांत फक्त 27 दिवसच वाहतूक झाली, ती सुद्धा गाडीत क्षमतेपेक्षा कमी भरून. याचा परिणाम नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 20 हजार टन धान्य तालुक्यात कमी मिळाले. त्यामुळे जानेवारी उजाडला तरी चार वेळाचे धान्य वाटप राहिले असून विलंब झाला आहे.

याबाबत खा. सदाशिव लोखंडे व खा. सुजयदादा विखे पा. यांना माहिती दिली होती. त्यानी महाप्रबंधक भारतीय खाद्य मंडळ मुंबई यांना माहिती दिली पण काही दिवसच वितरण सुरळीत झाले, नंतर जैसे थे.

शासनाचे धोरण वेळेत धान्य पुरवठा झाला पहिले असे आदेश आहेत. परंतु श्रीरामपूर येथील गोडावूनचा गलथान कारभार व तेथील अस्वछ गोडावूनमधून खराब धान्य मिळत आहे. याऐवजी नगर येथील गोडाऊनमधून धान्य दिल्यास, तेथे हमाल संख्या जास्त असल्यामुळे सुरळीत पुरवठा होईल व जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पुरवठा कार्यालयाचे लक्ष राहील.

धान्य दुकानात धान्यच न पोहचल्यामुळे अनेक दुकानदारांना जनतेच्या रोषाला सामोरे जाऊन वाद होताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.