चारा उत्पादनासाठी 11 हजार शेतकर्‍यांना मोफत बियाणे

पशुसंवर्धन विभाग || यंदा डिसेंबरअखेरपासून हिरव्या चार्‍याच्या टंचाईची शक्यता
चारा उत्पादनासाठी 11 हजार शेतकर्‍यांना मोफत बियाणे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घटलेले पर्जन्यमान आणि टंचाईची परिस्थती यामुळे पुढील दोन महिन्यांत जनावरांच्या चार्‍याचा विषय गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने जनावरांच्या चारा निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात ज्या शेतकर्‍यांकडे शाश्वत सिंचनाची सोय आहे, अशा शेतकरी-पशुपालक यांना पशुसंवर्धन विभागाने वैरण विकास योजनेतून 1 कोटी 15 लाख रुपये किंमतीचे मोफत मका बियाणे पुरवले आहे. जिल्ह्यात 11 हजार 98 शेतकर्‍यांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून बियाणे पुरवल्यानंतर साधारण दोन महिन्यांत हिरव्या चार्‍याचे उत्पादन अपेक्षीत आहे.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 73 टक्के पाऊस झालेला आहे. विशेष करून यंदा उत्तर जिल्ह्यात अकोले वगळता उर्वरित तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. उत्तर जिल्ह्यातील पावसाची तूट ही 28 ते 55 टक्क्यांपर्यंत आहे. यामुळे यंदा डिसेंबरअखेर टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरूवात होणार आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने चारा टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी पशुसवंर्धन विभाग वैरण विकास योजनेतून जिल्ह्यात चारा निर्मितीसाठी मका बियाणे खरेदी करून शेतकर्‍यांना ते वाटप केले आहे. सिंचनाची सोय असणार्‍या शेतकर्‍यांचा या योजनेत समावेश करून घेण्यात आला आहे. यासाठी पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेवून जिल्ह्यात वैरण विकास योजनेतून जास्तीजास्त चारा निर्मिती कशी होईल, यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

यासाठी दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू असून पाण्याची सोय बसणार्‍या शेतकर्‍यांकडून यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. जिल्हाभरातून कृषी विभागाकडे 16 हजार शेतकर्‍यांनी चारा उत्पादन करण्यासाठी अर्ज केला होता. आलेल्या अर्जातून पाणीच्या सोईसह अन्य यंत्रणा असणार्‍या 11 हजार 98 शेतकर्‍यांची निवड करून त्यांना चारा उत्पादनासाठी मका बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. बियाणे उपलब्ध करून दिल्यानंतर साधारणपणे दोन महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध होणार असल्याचा अंदाज पशूसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. बियाणे पुरवलेल्या शेतकर्‍यांकडील चारा उत्पादन, चारा पिकांची पेरणी यावर पशूसंवर्धन विभागाचे डॉक्टरय यांचे लक्ष आहे.

नुकताच राज्य सरकारने चारा उत्पादन आणि वैरण विकास योजनेच्या काही अटींमध्ये सुधारणा केलेली असून आता शेतकर्‍यांना अडीच हेक्टरपर्यंत चारा निर्मितीसाठी बियाणे पूरवण्यात येणार आहे. पूर्वी ही अट एक हेक्टर होती. साधारणपणे एका हेक्टरसाठी पशूसंवर्धन विभागाच्यावतीने 1 हजार 500 रुपयांचे बियाणे पूरवण्यात येत होते. आता ही मर्यादा 4 हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा शेतकर्‍यांसह चारा उत्पादन वाढीसाठी होणार आहे.

आता गाळपेर क्षेत्रावर चारा उत्पादनच

जिल्ह्यात अकोले, राहुरी, श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यात धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गाळपेर क्षेत्र आहे. धरणातील पाणी कमी झाल्यावर या जमीनी पेरणीसाठी उपलब्ध होत. पूर्वी या क्षेत्रावर शेतकर्‍यांना अन्य पिक घेता येत होते. मात्र, जिल्ह्यातील कमी पर्जन्यमान आणि टंचाई परिस्थिती पाहता यंदा गाळपेर क्षेत्रावर चारा उत्पादनाची शक्यती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे.

असे आहे बियाणे वाटप (शेतकरी)

नगर 550, राहुरी 560, श्रीरामपूर 218, राहाता 1 हजार 137, कोपरगाव 398, अकोले 425, संगमनेर 761, पारनेर 826, श्रीगोंदा 1 हजार 442, कर्जत 390, जामखेड 192, पाथर्डी 539, शेवगाव 300, नेवासा 1 हजार 542 एकूण 9 हजार 280 यासह अकोले तालुक्यातील आदिवासी भागात स्वतंत्रपणे 1 हजार 818 अशा एकूण 11 हजार 98 शेतकर्‍यांना मका बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com