पंचनामे पूर्ण होताच नुकसानग्रस्तांना मदत

पंचनामे पूर्ण होताच नुकसानग्रस्तांना मदत

मदत व पुनर्वसन राज्यमंत्री तनपुरे यांची माहिती

करंजी |वार्ताहर| Karanji

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे अनेक शेतकर्‍यांच्या शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पंचनामे पूर्ण होताच प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्‍याला सरकारकडून मदत देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

शेवगाव तालुक्यातील वरुर, भगूर, आखेगाव तर पाथर्डी तालुक्यातील कोरडगावसह परिसरातील नुकसानग्रस्त गावांना मंत्री तनपुरे यांनी गुरुवारी भेटी देऊन नुसकानग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना मंत्री तनपुरे म्हणाले सुमारे दोनशे मिलिमीटर पाऊस एकाच रात्री झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये एका शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला तर अनेकांच्या घरात पाणी घुसून घराचे देखील मोठे नुकसान झाले.

अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेतीबरोबरच बंधारे वाहून गेले. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून ज्यांच्या घरात पाणी साचले. त्या प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ देण्याचे तात्काळ सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्याच बरोबर पिठाच्या गिरण्या सुरू करण्यासाठी व गावातील सिंगल फेज सुरू करण्यासाठी महावितरण सूचना करण्यात आलेले आहेत. ज्या शेतकर्‍यांचे पशुधन पुरामध्ये वाहून गेले त्यांची पशुवैद्यकीय विभागाकडून माहिती घेऊन त्यांना देखील आर्थिक मदत केली जाणार आहे.

या ढगफुटीमुळे सुमारे तीनशे विजेचे खांब पडले असून ते देखील तात्काळ उभे करून विज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मदत कार्य करणार्‍या एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिकची मदत करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांना भेटून केले जाणार आहेत. शेवगाव तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले व पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी ज्यांचे संसार उघड्यावर आले त्यांना दोन वेळ जेवन देण्याचे नियोजन केले. त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे असे म्हणत प्रशासनाच्यावतीने देखील कोरडगाव येथे शिवभोजन सुरू करून 400 लोकांना शिवभोजन दिले जात आहे.

ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्या ठिकाणी शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याच बरोबर ढगफुटीमुळे लोकांमध्य भीती निर्माण झाल्यामुळे लोक एकत्र आले. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून या नुकसानग्रस्त गावामध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस प्राधान्य देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री तनपुरे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार शाम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब गाडे, तालुका कृषी अधिकारी शिंदे उपस्थित होते.

पाथर्डी-शेवगाव तालुक्याच्या ज्या भागात अधिक नुकसान झाले, त्या भागात प्राधान्याने भेटी देऊन प्रशासनाला सूचना केल्या. शुक्रवारी (आज) राहुरी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील 39 गावातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून त्या ठिकाणच्या शेतकर्‍यांनाही मदत देण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती मंत्री तनपुरे यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com