आधी बियाण्याची उगवण क्षमता तपासा मगच पेरणी करा

आधी बियाण्याची उगवण क्षमता तपासा मगच पेरणी करा

सोनगाव (वार्ताहर)

मागील वर्षी सोयाबीनला मिळाल्या बंपर भावामुळे सोयाबीन पिकाकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढला आहे. घरचे किंवा दुकानातून विकत आणलेले बियाणे पेरण्यापूर्वी शेतकर्‍यांनी त्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

लांबलेला पाऊस गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्याचे विविध भागात पडत आहे. सोनगाव पंचक्रोशीतही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे सोनगावच्या उसाच्या आगारातही सोयाबीन लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. उसाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर कारखान्यांनी ऊस वेळेत नेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे झालेले हाल बघता यंदा सोयाबीन व कापूस या दोन पिकाकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढला आहे.

परिसरातील जमीन कपाशी पेक्षा सोयाबीनच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे सोयाबीन लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल जास्त आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे पीक काढणीला आल्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विविध कंपन्यांचे सीड प्लॉटही पावसाच्या पाण्यात भिजले. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या बियाणाचा अभूतपूर्व तुटवडा होता. अशा परिस्थितीत बहुतांशी शेतकर्‍यांनी घरगुती बियाणे पेरणीसाठी घेतली आहे तसेच काही शेतकर्‍यांनी कृषी सेवा केंद्रातून वाट्टेल ती किंमत मोजून बियाणे खरेदी केली आहे.

या दोन्ही शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाणाची उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे. ती कशी तपासावी याबाबत माहिती देताना राहुरीचे तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळ म्हणाले,शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करण्यापूर्वी आधी सोयाबीनच्या बियाण्याची उगवणक्षमता तपासावी. पहिल्या पद्धतीमध्ये पेरणी करणार त्या बियाणातील शंभर बिया ओल्या बारदानात गुंडाळा. परसबागेत बी टोकावे. 70 बिया उगवल्या तर पेरणी करावी.

दुसर्‍या पद्धतीमध्ये सोयाबीनचे दहा बिया एका ग्लासमध्ये घ्याव्यात. ग्लास मध्ये पाऊन ग्लास पाणी टाकावे. पाच मिनिटांनी पाणी ओतून बियाणे प्लेटमध्ये घ्यावे. दहापैकी जर आठ बियांच्या आवरणाला सुरकुत्या पडल्या असतील तर बियाण्याची उगवण क्षमता 80 टक्के पर्यंत आहे, असे गृहीत धरावे.

शेतकर्‍यांनी स्वतः साठी लागणार्‍या बियाणाची गरज घरच्या उत्पादनातून भागविल्यास बाजारात बियाणे मिळण्यासाठी करावी लागणारी पायपीट व बाजारातील बियाणे उगवण झाले नसल्यामुळे होणारा मनस्तापसुद्धा टाळता येऊ शकतो. याबरोबर बियाणाचा खर्च कमी होऊन बचत होईल. लागवडीनंतर बियाण्यांची उगवण न झाल्यावर शेतकर्‍याला होणारा त्रास टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी बाजारातील किंवा घरचे अशा दोन्ही बियाणांची उगवण क्षमता तपासून मगच पेरणीसाठी वापर करावा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com