पोलीस उपअधीक्षक मिटके यांच्यावर आरोपीचा गोळीबार

पोलीस उपअधीक्षक मिटके यांच्यावर आरोपीचा गोळीबार

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील थरारनाट्य : आरोपी जेरबंद : दोन कट्टे आढळले

राहुरी l तालुका प्रतिनिधी| Rahuri

श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर निलंबित पोलीस अधिकार्‍याने गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या कानशिलाला गावठी कट्टा लावून एका महिलेच्या कुटुंबावर दहशत निर्माण करणारा आरोपी निलंबित पोलीस अधिकार्‍याला पकडण्यासाठी मिटके गेले होते. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. मिटके यांनी कट्ट्यावर ताबा मिळवत असताना कट्ट्यातून सुटलेली गोळी मिटके यांच्या पाठीमागे असलेल्या कॉन्स्टेबलला चाटून गेली. कॉन्स्टेबल बालंबाल बचावले. हे थरारनाट्य सुमारे दोन तास रंगले. नंतर मात्र आरोपीस पोलिसांनी झडप घालून जेरबंद केले.

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील एका महिलेच्या घरात काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या अल्पवयीन मुलीसह महिला व मुलाची आरोपी निलंबीत सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे याच्या ताब्यातून सुटका करण्यात आली.

ज्यावेळी त्या महिलेने आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला, त्यावेळी त्या आरोपीचे मोबाईल लोकेशन पुणे येथे मिळाले होते. मात्र, त्याने पोलिसांना चकवा दिला असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक बी.जी. शेखर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, नगरचे अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, उपाधीक्षक़ संजय सातव, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक़ समाधान पाटील आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

काल सकाळी सात वाजता आरोपी त्या घराजवळ पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनाने येऊन घरात जाण्यासाठी घराबाहेर दबा धरून बसलेला होता. सकाळी सात वाजता मुलांनी दरवाजा उघडल्यानंतर त्या निलंबित पोलीस अधिकार्‍याने घरात प्रवेश करून त्या महिलेच्या मुलगी व मुलाला ओलीस ठेवून घरातच डांबून ठेवले. आरोपीने बेडरुममध्ये असलेल्या त्या महिलेला बाहेर येण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीच्या कानशिलाला गावठी कट्टा लावला. त्यातच प्रसंगावधान राखून त्या महिलेने पोलिसांना ही घटना कळविली.

ही घटना समजताच पोलीसउपाधिक्षक संदीप मिटके हे तातडीने फौजाफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. श्री. मिटके यांच्यावर आरोपीने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, दोन्ही गोळ्या जमिनीच्या दिशेने गेल्या. त्यातील एक गोळी कॉन्स्टेबलला चाटून गेली. मात्र, हे दोन्हीही पोलीस अधिकारी बचावले.

गोळीबाराची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान मागील आठवड्यात त्या महिलेने त्या निलंबित पोलीस अधिकार्‍यावर राहुरी पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केलेला होता. त्याचा राग मनात धरून या आरोपीने अशी कृत्य केल्याची चर्चा चालू आहे.

अनर्थ घडला असता

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक बी.जी. शेखर यांनी राहुरी येथे भेट दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी घटनेची माहिती दिली. पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर कदाचित अनर्थ घडला असता. त्यामुळे पोलीस अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत. आरोपीने त्या महिलेची सोशल मीडियावर बदनामी केली होती. त्यावर त्या महिलेने आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपीकडून दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.