नेवाशाच्या सुसंस्कृत राजकारणाला गोळीबार प्रकरणामुळे तडा

नेवाशाच्या सुसंस्कृत राजकारणाला गोळीबार प्रकरणामुळे तडा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्विय सहायकांवर झालेला गोळीबार आणि त्यानंतर तालुक्यात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे नेवासा तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाला तडा गेला आहेत. यापूर्वी तालुक्यात टोकाचा राजकीय संघर्ष झाला. मात्र गोळीबारासारखी पातळी गाठली गेली नव्हती. भविष्यात याप्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यासाठी तालुक्यात राजकारण विरहित व्यक्तींनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

मंत्री गडाख यांचे स्विय सहायक राजळे यांच्यावर गोळीबाराची घटना गेल्या आठवड्यात घडली. त्यानंतर थेट गडाख यांच्या कुटुंबावर हल्ल्याची तयारी असल्याचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप समोर आली. या प्रकारामुळे नेवासा तालुका हादरला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. नेवासा तालुक्याचे नाव संत ज्ञानेश्वर यांच्यामुळे जगाच्या कानाकोपर्यात पोहचलेले आहे. संतांच्या या भूमीत गोळीबारासारख्या घटना अपेक्षीत नाहीत. मात्र, अलिकडच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आता काहीही घडू शकते, अशी परिस्थिती आहे.

नेवासा तालुक्याचे नेतृत्व आतापर्यंत अनेक दिग्गजांनी केलेले आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासह कुटुंबाने त्या दिग्गजांची परंपरा कायम राखली. मात्र गडाख कुटुंबातील सदस्यांवर राजकीय आरोपांसोबत आता थेट जीवघेणा हल्ल्याचे प्लॅनिंग होणे धक्कादायक आहे. या प्रकारामुळे तालुक्याच्या राजकारणाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यात राजकीय गुंडगिरी सुरू राहिल्यास तालुक्यातील नेतृत्वाने काम कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आता समाजकारणासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवण्यासोबत, डोके वर काढत असलेली राजकीय गुंडगिरी मोडून काढण्यासाठी सर्वपक्षीय चळवळ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

असमर्थनीय घटना

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी या घटनांवर चिंता व्यक्त केली. सार्वमतशी बोलताना ते म्हणाले, सध्या तालुक्यात घडणार्‍या घटना अतिशय चुकीच्या आहेत. त्यांचे समर्थन कोणीही करणार नाही. तालुक्याच्या राजकीय जडणघडणीत वकीलराव लंघे पाटील, मारुतराव घुले पाटील, संभाजीराव फाटके, यशवंतराव गडाख पाटील या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. आतापर्यंत तालुक्याचे वातावरण सुसंस्कृत होते. मात्र सध्याच्या घटना कटू वातावरण निर्माण करणार्‍या आहेत. हा प्रकार संवेदनशील असून कोणाच्याही कुटुंबाबाबत असे घडू नये, अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.