अत्याचार पीडितांना ‘मनोधैर्य’चा आधार

10 महिन्यांमध्ये 109 प्रकरणे निकाली: पावणे दोन कोटींचे अर्थसहाय्य मंजूर
अत्याचार पीडितांना ‘मनोधैर्य’चा आधार

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - अत्याचार पीडितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणार्‍या मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येते. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांच्या कार्यकाळात जिल्हा मंडळाने सप्टेंबर 2020 पासून 10 महिन्यांत 109 प्रकरणे निकाली काढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पिडीतांना एक कोटी 76 लाख 25 हजार रूपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. करोनाच्या काळात अनेक पीडितांना या अर्थसहाय्यामुळे दिलासा मिळाला आहे.

डिसेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार यापुर्वी महिला बालविकास विभागाकडे (Department of Women & Child Development) असलेली मनोधैर्य योजना सुधारित नवीन मनोधैर्य योजना म्हणून कार्यन्वित करण्यात आली. त्याअतंर्गत महिलांवरील अत्याचार, बालकांवरील अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला झालेल्या महिलांना अर्थसहाय्य दिले जाते. पिडीतांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे व मंजुरीबाबतचे सर्व अधिकार जिल्हा विधी प्राधिकरण यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मंडळ कार्यरत आहे. या मंडळात जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाच्या सचिव, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्सचिकित्सक यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

अन्याय झालेली पिडीत महिला स्वत: किंवा संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांमार्फत जिल्हा मंडळाकडे अर्ज करू शकते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पिडीताचे नाव गोपनीय ठेवले जाते. तसेच या योजनेअंतर्गत पिडीताला आर्थिक सहाय्याबरोबरच मानसिक आधार दिला जातो. वैद्यकीय व कायदेशीर मदत देखील केली जाते. पिडीतेवर झालेल्या अत्याचाराचे स्वरूप पाहून 10 लाखांपर्यत आर्थिक मदत करण्यात येते. सुरूवातीला काही रक्कम देऊन उर्वरीत रक्कमेची एफ.डी. पिडीतेच्या नावावर करण्यात येते. परंतु पिडीतेने जाणूनबुजून तिचा जबाब फिरवल्यास तसेच पोलीस, न्यायालय व जिल्हा मंडळाला सहकार्य न केल्यास नुकसान भरपाई नाकारता येते. सुरूवातीला दिलेली रक्कम देखील परत वसुल करता येते.

अत्याचार झालेल्या जिल्ह्यातील पिडीत महिला, बालकांनी नवीन मनोधैर्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत आणेकर, सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेविषयक जागृती शिबीरे व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते, अशी माहिती सचिव देशपांडे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com