जप्ती आदेश नसताना फायनान्स कंपनीच्या एजंटांनी दुचाकी नेली; गुन्हा दाखल

जप्ती आदेश नसताना फायनान्स कंपनीच्या एजंटांनी दुचाकी नेली; गुन्हा दाखल

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

दुचाकी वाहन जप्तीचा आदेश नसतानाही बेकायदेशीरपणे घराच्या आवारातून धक्काबुक्की करून फायनान्स कंपनीच्या एजंटांनी दुचाकी पळविल्याची घटना सावतानगर येथे घडली. याबाबत दखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात शोभा पोपटराव नाईक (वय 45) रा.सावतानगर धंदा घरकाम यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आम्ही, पती पोपटराव व मुलगा संदीप यांच्यासह एकत्र राहतो.

ज्युपीटर स्कुटी या दुचाकीसाठी आम्ही टिव्हीएस क्रेडिट सर्विस लिमिटेड या कंपनीचे कर्ज घेतलेले आहे. माझी स्कुटी घराच्या आवारात चावी लावलेली असताना गुरुवार (दि.15) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन व्यक्ती घराच्या आवारात समोरील दरवाजा उघडून आतमध्ये आले.

मी बाहेर आले असता फायनान्स कंपनीचा एक व्यक्ती माझ्या गाडीवर बसून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना मी समोरून आडवे होऊन गाडीचे हँडल पकडले व गाडी का घेऊन चाललात? असे विचारले असता त्यावेळेस प्रवीण आनंदराव शिंदे (रा.राहुरी) व गोपाळ गावडे (रा. अहमदनगर) यांनी गाडी जप्तीचा कोणताही आदेश नसताना धक्काबुक्की, दमबाजी करून वरील वर्णनाची तीस हजार रुपये किंमतीची निळ्या रंगाची टिव्हीएस ज्युपीटर स्कुटी (एमएच 17 सीएम 8064) पळवून नेली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामधील एका आरोपीला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com