मुलीला चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली 23 लाखांना गंडा

शिक्षकाची फसवणूक || कोतवाली पोलिसांकडून दोघांना अटक
मुलीला चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली 23 लाखांना गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली एकाने शिक्षकाची 23 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 23 लाखाच्या मोबदल्यात कार देण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीने एका तोतया आरटीओ अधिकार्‍याला सोबत घेऊन शिक्षकाच्या बोगस कागदपत्रांवर सह्या घेण्याचा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत अटक केली.

राजेश भगवान पवार (वय 33 रा. चोळी तांडा, ता. कंधार, जि. नांदेड, हल्ली रा. बीड बायपास, एमआयटी कॉलेज जवळ, जि. छत्रपती संभाजीनगर) व अमित अरविंद देशमुख (रा. बीड बायपास, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिरीषकुमार नारायण कदम (वय 50 हल्ली रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, सावेडी, अहमदनगर, मूळ रा. जामखेड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची सन 2016 मध्ये राजेश भगवान पवार याच्या सोबत ओळख झाली होती.

त्याने फिर्यादीच्या मुलीचे बेला चित्रपटात सिलेक्शन केले. सदर चित्रपटाच्या शुटींगसाठी मार्च 2019 मध्ये ओतुर (जि. पुणे) येथे बोलविण्यात आले. फिर्यादी मुलीला घेऊन सदर ठिकाणी गेले. दरम्यान, पवार याने एकच दिवस शुटींग केल्यानंतर पुढील शुटींगसाठी फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. पवार याने फिर्यादी यांना खोटे बनावट तयार केलेले कागदपत्रे दाखवून वेळोवेळी रोख, चेक व फोन पे व्दारे 23 लाख रुपये घेतले. चित्रपटात कोणतीही भूमिका न देता फसवणूक केली.

दरम्यान, 23 लाख रुपयांच्या मोबदल्यात हॅरेअर कार देतो, असे सांगून पवार याने फिर्यादीला बुधवारी (दि. 1 नोव्हेंबर) नगर आरटीओ कार्यालयासमोर बोलून घेतले. फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी सदरचा प्रकार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती दिली. निरीक्षक यादव यांनी आपल्या पथकासह सापळा लावला. कार देण्याच्या नावाखाली बोगस कागदपत्रांवर सह्या घेताना तोतया आरटीओ अधिकारी देशमुख व पवार यांना पोलिसांनी पकडले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com