अधोरेवाडीच्या सोसायटी अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हे दाखल

साडेचौतीस लाखांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघड
अधोरेवाडीच्या सोसायटी अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हे दाखल

श्रीगोंदा ( प्रतिनिधी)

श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी येथील गहिनीनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, बँक इनस्पेक्टर व संचालक मंडळ यांनी संगमताने सेवा संस्थेत ३४ लाख ७७ हजार ३३३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गहिनीनाथ सेवा संस्थेच्या चाचणी लेखापरीक्षण कालावधी मध्ये मच्छिंद्र रामचंद्र अधोरे (अध्यक्ष), परशुराम शिवराम लकडे (उपाध्यक्ष), मच्छिद्र लक्ष्मण काळे (संचालक), गोरक्ष अंकुश लकडे (संचालक), दिगबर येडे (संचालक), शिवाजी छगन मोटे (बँक इनस्पेक्टर) उत्तम रामचंद्र अधोरे (कर्जदार व संचालक), शकुंतला उत्तम अधोरे (कर्जदार), योगेश उत्तम अधोरे (कर्जदार), अलका अजिनाथ पारे (कर्जदार), अजिनाथ ज्ञानदेव पारे (कर्जदार), यांनी संगनमत करून कमाल कर्ज मयदिपेक्षा जादा कर्जवाटप पुर्वीचे कर्ज थकीत असताना नव्याने कर्जवाटप धारण क्षेत्र नसताना कर्जवाटप करणे व चेअरमन सचिव व संचालक तसेच बँक इनस्पेक्टर या पदाचा दुरुपयोग करुन आपले नातेवाईकांना व स्वतःचे नावाने कर्ज वाटप केले आहे. एकूण ३४ लाख ७७ हजार ३३३ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे.

याबाबत लेखापरीक्षक महेंद्र काशिनाथ गवळी यांनी फिर्याद दाखल केली आहे. महेंद्र गवळी यांनी गहिनीनाथ सेवा संस्थेचे चाचणी लेखापरीक्षण पूर्ण केले होते. लेखापरीक्षण करताना संस्थेच्या कारभारात अपहार झाला असल्याचे स्पष्ट झाले. त्या अनुशंगाने संबंधित अपहाराबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीगोंद्याचे सहाय्यक निबंधक यांनी परवानगी दिली आहे. गवळी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादंवी ४२०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहेत.

श्रीगोंद्यात सोसायट्यांची भ्रष्टाचारात आघाडी

श्रीगोंदा तालुक्यात सोसायट्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण मोठे आहे. यापूर्वीही काही सेवा संस्थेच्या कारभाराने सभासद अडचणीत आले आहेत. यात तालुक्यातील पेडगाव सेवा संस्थेत केलेल्या अपहार प्रकरणी सचिवासह लोकल सचिव जेल वारी केली आहे तर घोडेगावसह अन्यही अनेक संस्थेत सभासदांच्या परस्पर घोटाळे घालण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com