लसीकरणात राजकीय हस्तक्षेप करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

काँग्रेस पदाधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
लसीकरणात राजकीय हस्तक्षेप करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - लसीकरणात राजकीय हस्तक्षेप करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयामध्ये ग्रामीण रुग्णालयामार्फत शासकीय करोना प्रतिबंध लसीकरण सुरू आहे. या केंद्रावर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता असे लक्षात आले की, नगराध्यक्षा यांचे वाहन चालकाने जाहीर केलेल्या यादीत नाव नसताना सुद्धा व प्रसिद्ध केलेल्या यादीत नाव असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक प्रतीक्षेत असताना रांग मोडून शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांवर राजकीय दबाव टाकून एका व्यक्तीस लस देण्यास भाग पाडले.

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, सुहास परदेशी यांनी यादीत नाव नसलेल्या व्यक्तीच्या लसीकरणास हरकत घेतली. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे सुद्धा घटनास्थळी आले व त्यांनाही सदर व्यक्तीचे नाव नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत नसल्याची खात्री पटली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून 353, 34 नुसार कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस पदाधिकार्‍यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com