‘पाथर्डी बांधकाम’चे उपअभियंता, शाखा अभियंत्यांवर गुन्हे दाखल करा

वंचित आघाडीकडून झेडपी अतिरिक्त सीईंओना निवेदन
‘पाथर्डी बांधकाम’चे उपअभियंता, शाखा अभियंत्यांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर (प्रतिनिधी) - रस्ता दुरूस्तीचे मंजूर काम पूर्ण न करता कागदोपत्री पूर्ण झाल्याचे भासविणार्‍या पाथर्डी पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि शाखा अभियंता त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडर्तफ करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याकडे करण्यात आली आहे.

तालुक्यातील पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे रस्ता दुरूस्तीसाठी 10 लाखांचा निधी मंजूर झाला होता. हे काम पाथर्डी पंचायत समिती बांधकाम विभागातंर्गत होते. परंतू रस्त्यांची दुरुस्ती न करता प्रभारी उपअभियंता व शाखा अभियंता यांनी कागदोपत्री झाल्याचे भासून खोटे मोजमाप पुस्तक क्रमांक 4358 मध्ये लिहिले व खोटे देयक तयार करून शासनाची 10 लाख रुपयांची रक्कम अपहार करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मोजमाप पुस्तक मधील प्रत्यक्षात काम झाले नसतानाही खोटे मोजमापे लिहिले असून ती मोजमापे बरोबर आहे, यास दुजोरा देणारी तपासणीची स्वाक्षरी कार्यकारी अभियंता यांनी केली आहे. पाथर्डीच्या बांधकाम विभागात कोट्यावधी रुपयाची विकास कामे प्रभारी उपअभियंता व शाखा अभियंता यांच्या अंतर्गत सुरू आहेत. जर 10 लाखांच्या 100 टक्के खोटे बिल राजरोसपणे काढून गैरप्रकार होत असले तर अन्य कामांचे काय असा सवाल वंचितच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

यामुळे प्रभारी उपअभियंता आर. डी. राठोड व शाखा अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी वंचितचे सुनील शिंदे, दिलीप साळवे, विनोद गायकवाड यांनी केली आहे. अन्यथा खंडपीठाप्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com