वांबोरीत दोन कुुटुंबात हाणामारी

दोन महिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ; सर्व आरोपी अटक
वांबोरीत दोन कुुटुंबात हाणामारी

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सामायीक बांधावरील गवत व झुडपे जाळल्याच्या व झुडपे तोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात काठीने व कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याच्या घटना दि. 20 मे रोजी घडल्या. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात मारहाण व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, घटनेनंतर दोन्ही कुटुंबातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे.

50 वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 20 मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेचा पती व मुलगा हे त्यांच्या शेताच्या बांधावर पाहणी करत होते. यावेळी त्यांना सामायीक बांदावरील गवत, झुडपे ही जाळून टाकलेली दिसून आली. तेव्हा फिर्यादी महिलेने तेथे असलेले आरोपी उत्तम भानुदास सत्रे, आशाबाई उत्तम सत्रे दोन्ही राहणार वांबोरी, ता. राहुरी यांना तुम्ही बांधावरील गवत व झुडपे का जाळलीस? अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी महिलेचा पती व मुलगा यांना शिवीगाळ करुन तुम्ही आमचे नादी लागू नका. नाहीतर तुमचे कुर्‍हाडीने तुकडे करुन टाकीन. असे म्हणून फिर्यादीस काठीने व कुर्‍हाडीचे उलट्या तुंब्याने मारहाण केली. पती व मुलगा यांनी भांडण सोडवले. दरम्यान फिर्यादी महिलेच्या डोक्यात मार लागल्याने त्यांना चक्कर आल्याने त्या सुबाभळीच्या झाडाखाली बसल्या.

त्या 50 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी उत्तम भानुदास सत्रे व आशाबाई उत्तम सत्रे दोघे राहणार वांबोरी ता. राहुरी यांच्या विरोधात गुन्हा रजि. नं. व कलम - ख 387/21 भादंवि. कलम- 324, 427, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, फिर्यादी ही त्यांचे वांबोरी शिवारातील शेत गट नं 1549 मधील विहीरीचे काठावरील झुडपे तोडत होती. तेथे माणिक भानुदास सत्रे हा आला व फिर्यादीस झुडपे का तोडली? असे म्हणाला. तेव्हा फिर्यादी महिला त्यांना म्हणाली, झुडपाचा पाला विहीरीत पडून पाणी खराब होत आहे. त्यामुळे मी झुडपे तोडली. असे म्हणाले असता आरोपीने तिला व तिच्या पतीला शिवीगाळ करुन विकास माणिक सत्रे याने लाथाबुक्क्याने मारहाण केली व माणिक यांनी त्याचे हातातील काठीने फिर्यादीस व तिच्या पतीला मारहाण केली. तुम्ही आमचे नादी लागलास तर तुमचे सपराचे घर पेटवून देवून तूम्हाला ठार मारून टाकू. अशी धमकी दिली.

त्या 35 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी माणिक भानुदास सत्रे, विकास माणिक सत्रे, दोघे रा. वांबोरी ता. राहुरी यांच्या विरोधात गुन्हा रजि. नं. व कलम ख 388/21 भादंवि. कलम- 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास हवालदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com