
अहमदनगर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (maharashtra state examination council) घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ (scholarship examination 2022) आता २० जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा परिषदेतील टीईटी परीक्षेतील घोटाळ्यामुळे (TET exam scam) गेल्या काही महिन्यांपासूनही शिष्यवृत्ती परीक्षा रखडली होती, मात्र परीक्षा परिषदेने परीक्षेची तारीख अखेर जाहीर केली.
करोनाच्या (COVID19) पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर पडली होती. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना परीक्षा परिषदेतील शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा (TET exam) आणि त्यानंतर झालेली दफ्तर दिरंगाई यामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी आवश्यक कालावधी दिला होता, परंतु तरीही काही कारणांमुळे अद्याप ऑनलाइन अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी परिषदेने दिली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २३ ते ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.