सरकारी आदेशाचे पालन करुन सण उत्सव पार पाडा
सार्वमत

सरकारी आदेशाचे पालन करुन सण उत्सव पार पाडा

पो. नि. खान : टाकळीभान येथे शांतता समितीची बैठक

Arvind Arkhade

टाकळीभान|वार्ताहर|Takalibhan

करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामीण भागातही करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने येणार्‍या काळात खबरदारी घेणे गरजेचे आहे. येणारा गणेशोत्सव, ईद व बैलपोळा हे सण शासकिय नियमांचे काटेकोर पालन करुनच साजरे करावेत, असे प्रतिपादन श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मसुद खान यांनी केले.

टाकळीभान पोलीस दुरक्षेत्राच्या प्रांगणात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी मौलाना शेख, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, माजी उपसरपंच भारत भवार, ग्रा.पं. सदस्य कान्होबा खंडागळे, भाऊसाहेब पवार, मधुकर मैड, प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, भाजपाचे नारायण काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पो. नि. खान म्हणाले की, करोनाचा कहर वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नियमावली केलेली आहे. त्या नियमांचे काटेकोर पालन करुन सण, उत्सव साजरे करायचे आहेत. गणपती उत्सव साधेपणाने गर्दी न करता करायचा आहे. ईद सणासाठीही नमाज पठण घरातूनच करायची आहे.तर बैल पोळ्याच्या सणासाठीही नियमाचे पालन करुन गर्दी टाळायची आहे. तोंडाला मास्क, सामाजिक अंतर व गर्दी टाळण्यासाठी शासनाचे नियम नागरिकांनी पाळून प्रशासनास सहकार्य करुन करोनावर मात करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी अप्पासाहेब रणनवरे, भैय्या पठाण, विलास सपकळ, विलास दाभाडे, विष्णुपंत पटारे, गणेश गायकवाड, बंडु हापसे, नाना ब्राम्हणे, अर्जुन राऊत, पप्पू रणनवरे, शंकर कोकणे, अक्षय कोकणे आदींसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने आपण गावात करोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी खबरदारी घ्यायची आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाच्या नियमाचे पालन करुन गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करु. छोट्या मोठ्या गणेश मंडळांनी आपापल्या मंडळाचा गणपती न बसवता गावाच्यावतीने ग्रामसचिवालयासमोरील प्रांगणात एकच गणपती बसवून एक गाव एक गणपती संकल्पना राबवून शासकिय नियमांचे पालन करत यंदाचा गणेसोत्सव साध्या पध्दतीने साजरा करु, अशी बैठकीत चर्चा झाल्याने एकमताने पाठींबा देण्यात आला. त्यामुळे गावात एकच गणपती बसवून एक गाव एक गणपती संकल्पनेचा मार्ग मोकळा झाल आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com