खते घेण्यासाठी शेतकर्‍यांची झुंबड

पुणतांब्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
खते घेण्यासाठी शेतकर्‍यांची झुंबड

पुणतांबा|वार्ताहर|Puntamba

येथील कृषी सेवा केंद्रात युरिया उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांची मोठी गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडला आहे. नंबरवरून शेतकर्‍यात तर युरियाच्या वाटपावरून कृषी सेवा केंद्र चालक व शेतकर्‍यांमध्ये बाचाबाची होत आहे.

गेल्या अनेक दिवसापासून शेतकर्‍यांना विविध खते विशेषता युरिया मिळत नव्हती. खरीप हंगामात सुरूवातीला पाऊस चांगला झाला असून शेतकर्‍यांनी नगदी पीक सोयाबीन, मका व अन्य पिके घेण्याचे प्रमाण कमी असले तरी या पिकांना विशेष प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आवश्यक पिकांना खते देणे गरजेचे होते.

परंतु गेल्या अनेक दिवसापासून खते उपलब्ध होत नव्हते. येथील कृषी सेवा केंद्रात युरीया उपलब्ध झाल्यामुळे युरिया खरेदीसाठी एका आधार कार्डावर एक गोणी देण्याचे नियोजन केल्यामुळे कुंटुंबातील इतर लहान मुलांना देखील आधार कार्ड झेरॉक्स घेवून नंबरला उभे राहावे लागत आहे.

युरिया कमी मागणी जादा त्यामुळे आपल्याला आवश्यक युरिया मिळावा या हेतूने शेतकरी मोठ्या संख्येने सकाळीच कृषी सेवा केंद्राच्या दुकानापुढे येवून बसतात. इतकी खतांची युरियाची गरज आहे त्याशिवाय पिक दम धरणार नाही. पेरणीचा खर्च वाया जाईल या चिंतेत शेतकरी आहे. त्यामुळे जीवाची पर्वा देखील करत नाही म्हणून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून फिजीकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.

कोवीड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्स पाळावे म्हणून पुणतांबा ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारी बोलावून शेतकर्‍यांना फिजिकल डिस्टन्स पाळावे म्हणून नियंत्रण केले. शिवाय 334 युरिया गोण्या उपलब्ध झाल्या असून एका व्यक्तीला एक गोणी आधार कार्डप्रमाणे द्यावा, आशी कृषी विभागाकडून सुचना आहे. त्याप्रमाणे वाटप करतो. काही जास्त मागणी करतात विनाकारण वाद होतो, असे कृषी सेवा केंद्राचे अशोक लोहकणे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com