केंद्राच्या वाढीव अनुदानानंतरही खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता

पालकमंत्र्यांचा अंदाज || लिंकिंग करणार्‍यांवर कडक कारवाईचे आदेश
केंद्राच्या वाढीव अनुदानानंतरही खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कच्चा मालाचा तुटवडा आणि रशिया आणि युक्रेन युध्दामुळे केंद्र सरकारने रासायिक खतांना जाहीर केलेल्या अनुदानानंतर देखील रासायनिक खातांच्या किंमती वाढणार असल्याचा अंदाज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. तसेच खरीप हंगामासाठी युरियासोबत अन्य खतांची सक्ती करणार्‍या, लिंकिंग करणार्‍यांवर कृषी विभागाने कडक कारवाई करावी, असे आदेश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम नियोजन बैठकींनतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, खतांच्या किंमतीचा विषय हा केंद्र सरकारशी निगडीत आहे. शेतकर्‍यांना रास्त आणि मुबलक खतांचा पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे सांगत खतांच्या लिंकिंगसह शेतकर्‍यांच्या अन्य काही तक्रारी असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, अथवा राज्य सरकारच्या टोल फ्री नंबर संपर्क साधावा. यासह कृषी विभागाने नियुक्त केलेले भरारी पथक त्यांच्या पातळीवर कारवाई करतील असे एका प्रश्नावर उत्तर देतांना मुश्रीफ म्हणाले.

भोंगा प्रकरणावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रक्रिया दिलेली असून धार्मिक तेढ निर्माण होवू नये ऐवढीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील मंत्री यांच्या स्वीय सहायकावर झालेला हल्ला तसेच कुटूंबाला दिलेल्या धमकी प्रकरणावर पोलीस अधीक्षक पाटील यांच्याशी चर्चा झाली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी दोनदा आरोग्य विभागाला सुचना दिलेल्या आहेत. आरोग्य विभागाने चौकशी करून पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती पुढील वेळी देवू. त्यावेळी जर मी पालकमंत्री राहिलो नाही, तर जे कोणी पालकमंत्री असतील त्यांना याबाबत माहिती देण्याच्या सुचना करू असेही मुश्रीफ म्हणाले.

शेती शाळेत माहिती द्यावी

जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या शेती शाळेत सध्या कृषी साहयक गावागावातील 20 ते 25 लोकांना शेतीविषयक माहिती देतात, ही संख्या 100 ते दीडेश लोकांपर्यंत वाढवण्याची मागणी आ. लहू कानडे यांनी केली. ही मागणी कृषी अधिकारी जगताप यांनी मान्य करत जिल्ह्यात 336 रिर्सोस फार्मस यांची निवड केली असून एक गाव एक कापूस वान याचा प्रयोग करण्यात येत असल्याचे सांगितले.

गुजरातला पूर्ण परतावा

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राकडे सापत्न भावनेने पाहिले जाते. गुजरातला जीएसटी परतावा पूर्ण दिला जातो, पण महाराष्ट्राला दिला जात नाही. संघराज्य म्हणून एका नजरेने बघितले पाहिजे, अशी आमची भावना आहे, असे स्पष्ट करून मुश्रीफ म्हणाले, रशिया व युक्रेनच्या युद्धाने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. त्यावर केंद्र सरकार महाराष्ट्राला व्हॅट कमी करण्याचे सांगत आहे. पण आधी आमचे जीएसटीचे थकलेले 26 हजार कोटी तातडीने द्या. मग आम्हीही दर कमी करतो. शेवटी राज्य पण चालले पाहिजे ना, असे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी केले.

Related Stories

No stories found.