खतांच्या दरवाढीने शेतकर्‍यांच्या संकटात वाढ

दरवाढ मागे घेण्याची मागणी
खतांच्या दरवाढीने शेतकर्‍यांच्या संकटात वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी) - यंदा रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असून खत कंपन्यांनी प्रत्येक खताच्या पोत्यामागे दीडपट भाववाढ केली आहे. ही भाववाढ शेतकर्‍याचं आर्थिक कंबरडे मोडणारी असून केंद्र सरकारने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

सद्यस्थितीत करोना, लॉकडाउन, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या शेतकर्‍यांना रासायनिक खताच्या भाववाढीने आर्थिक संकटात टाकले आहे. रासायनिक खताची निर्मिती करणार्‍या सर्वच कंपन्यांनी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी भाववाढ केली. शेतकर्‍यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खताची गरज ओळखून खत निर्मिती कंपन्यांनी दरवाढ केल्याचे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

राज्यात रासायनिक खताचा पिकांसाठी वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे भाववाढीचा जबर फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. जवळपास सर्वच कंपन्यांनी खताचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत अव्वाच्या सव्वा वाढवून ठेवलेत. असे असताना केंद्रशासनाने कुठलीही दरवाढ मागे घेतली नाही किंवा तसे आदेश सुद्धा खत कंपन्यांना दिले नाही. परिणामी शेती पिकवणे आता शेतकर्‍यांना जिकिरीचे बनले आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांच्या जशा किंमती वाढल्या त्या तुलनेत शेतमालाचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे कसे शेतकरी सुधरतील आणि कसे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होईल? असा प्रश्‍नही शेतकरी उपस्थित करत आहेत.

रासायनिक खतांच्या किमती या पेट्रोलीयमच्या दरावर अवलंबून असतात. यामुळे खतांच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, सध्याची कोविडची परिस्थिती पाहता, शेतकर्‍यांना मालाला भाव नसल्याने केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढून द्यायला नको होत्या आणि दर वाढ रोखणे शक्य नव्हते, तर शेतकर्‍यांना अनुदान देऊन आर्थिक समतोल साधण्याची गरज होती.

अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com