चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी

राहात्यात एका विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल
चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी

राहाता |वार्ताहर| Rahata

चाकूचा धाक दाखवून पैश्याची मागणी करणार्‍या व्यक्ती विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. राहाता पोलिसांनी पैशाची मागणी करणार्‍या व्यक्तीला अटक केली आहे.

सागर फिलीप निकाळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मी व माझी पत्नी वैशाली आणि 18 महिन्यांची मुलगी दीक्षा आम्ही तिघे दुचाकी वाहनावर राहाता शहरात कपडे खरेदी करून घरी जात असताना गौतम नगर येथे चारी नंबर 14 जवळ माझ्या ओळखीचा ढब्या उर्फ आकाश बाळासाहेब गायकवाड हा आमच्या मोटारसायकलला आडवा आला. तेव्हा मी मोटरसायकल थांबवली असता तो मला म्हणाला की मला दारू पिण्यासाठी पैसे दे, तेव्हा मी त्याला पैसे नाही असे सांगितले. त्याचा त्याला राग आला व तो मला शिवीगाळ करू लागला तसेच त्याने माझी पत्नी वैशाली हिला सुद्धा शिवीगाळ केली.

मी त्याला समजावून सांगत असताना त्याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून मला दाखविला व म्हणाला की तू जर मला पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही, असे म्हणून माझ्या खिशात हात घालून माझ्या जवळ असलेले 500 रुपये काढून घेतले. मी दुचाकी चालू करून घरी गेलो व घरी गेल्यानंतर घडलेली सर्व हकीकत माझ्या वडिलांना सांगितली. त्यानंतर मी ,माझे वडील, भाऊ आकाश, चुलते रामभाऊ निकाळे असे आम्ही सर्व ढब्या गायकवाड यास समजावून सांगण्यासाठी गेलो असता त्याने पुन्हा आम्हा सर्वांना शिवीगाळ केली तसेच त्याच्याकडील असलेल्या चाकूने आम्हाला धाक दाखविला. त्यावेळी तिथे असलेल्या नागरिकांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावून त्यास पकडून ठेवले. मी माझे चुलते गणेश निकाळे यांना फोन करून पोलिसांना घेऊन येण्यास सांगितले असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन ढब्या यास ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी सागर फिलीप निकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी करणार्‍या ढब्या गायकवाड याच्या विरोधात भादंवि कलम 392, 504, 506 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com