राज्यात बंदी नसताना बेलापूर ग्रामपंचायत प्रशासनाचा वृत्तपत्र बंद ठेवण्याचा फतवा

राज्यात बंदी नसताना बेलापूर ग्रामपंचायत प्रशासनाचा वृत्तपत्र बंद ठेवण्याचा फतवा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - लॉकडाऊन काळात वृत्तपत्र विक्रीला राज्यात बंदी नसताना बेलापूर ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील वृत्तपत्र विक्री बंद करण्यास भाग पाडल्याने वृत्तपत्र वाचकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुक्यात सर्वत्र पेपर विक्री सुरू असताना बेलापूर येथे मात्र ती बंद ठेवण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. बेलापूर गाव कालपासून पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दिवसात कडक लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

त्यामुळे केवळ दवाखाने व औषध दुकाने वगळता जिवनावश्यक वस्तुंसह इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. त्यात वृत्तपत्र विक्रीही बंद ठेवण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पाच दिवस पेपरची विक्री करू नये, असे फर्मान काढल्याने काल कोणालाही वृत्तपत्र वाचावयास मिळाले नाही.

याबाबत अनेक वाचकांनी वृत्तपत्रांच्या कार्यालयाकडे चौकशी केली असता राज्यात कोठेही वृत्तपत्र विक्रीस बंदी नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनीही वृत्तपत्रे विकण्यास परवानगी दिली असून विक्रीसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत मुभा दिली आहे. असे असताना स्थनिक प्रशासनाने वृत्तपत्र विक्री करू नये, असा फतवा काढल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक वाचकांनी वृत्तपत्रांच्या कार्यालयाकडे याबाबत आपली नाराजी व्यक्त केली असून करोनाचे नियम पाळून वृत्तपत्र विक्री पुर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com