फादर्स डे विशेष : अधिकारी होण्यासाठी वडिलांची प्रेरणा !

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
फादर्स डे विशेष : अधिकारी होण्यासाठी वडिलांची प्रेरणा !

अहमदनगर | सचिन दसपुते | Ahmednagar

वडिल कृषी खात्यामध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांची इच्छा होती की, आपल्या मुलाने एक तर आर्मी मध्ये जाऊन देशसेवा करावी, अथवा सरकारी अधिकारी म्हणून लोकांची सेवा करावी. यासाठी त्यांनी पहिल्यापासून प्रयत्न केले. मी इंजिनिअर झाल्यानंतर वडिलांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा आग्रह धरला आणि मला दरम्यानच्या काळात आवड निर्माण झाली. अधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले. आज जे काही काम करतो ती सर्व प्रेरणा माझ्या वडिलांची असल्याचे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

जूनच्या तिसर्‍या रविवारी जगभरात ‘फादर्स डे’ उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने अधीक्षक पाटील यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अधीक्षक पाटील यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील तासगाव असून त्यांचे वडिल गोविंद पाटील कृषी खात्यामध्ये नोकरीला होते. त्यांचे 2007 मध्ये निधन झाले आहे. वडिलांविषयी बोलताना ते म्हणाले, मुलाने सरकारी नोकरी करावी यासाठी त्यांनी मला सेमी इंग्रजी स्कूलमध्ये टाकले. पुढे मी इंजिनिअरींग केले.

परंतु, वडिलांची इच्छा सरकारी नोकरी असल्याने व मलाही त्याविषयी आवड निर्माण झाल्याने मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अधिकारी झाल्यानंतर एक अधिकारी म्हणून आयुष्यभर कसे काम केले पाहिजे याची सर्व प्रेरणा वडिलांकडून मिळाली. आज कोणाच्यातरी मदतीला येणार आहे, अशी भावना ठेऊन कार्यालयात जाण्याचा संदेश आजही जीवनात उपयोगी येत आहे.

वडिलांसोबत काम करणार्‍या लोकांची ते खूप काळजी घेत असे. त्यांची प्रेरणा मला मिळाली आहे. आजही वरिष्ठ अधिकारी पदावर काम करत असताना कनिष्ठ अधिकारी, कर्मचार्‍यांची मी काळजी घेतो. त्यांच्याविषयी काही तक्रारी असल्यास दोन्ही बाजू समजून घेत पुढील कारवाई केली जाते. कार्यालयात सकाळी कामाला सुरूवात केल्यानंतर येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे काम केले जाते. काही चूक झाली, कोणाला न्याय देऊ शकलो नाही, याचा हिशोब ठेवत त्या व्यक्तीला योग्य न्याय देण्याची शिकवण वडिलांनी दिली आहे. खुर्चीवर बसल्यानंतर कोणाच्या तरी मदतीसाठी आपण येथे बसलो असल्याची भावना मनात ठेऊन काम करत गेल्यास त्याचा आनंद मिळतो, असे वडिल नेहमी सांगत होते. त्यांनी दिलेल्या तत्वाने काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे, अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

आपण किती काम करतो, कसे काम करतो हे आपल्या वरिष्ठांपेक्षा कनिष्ठांना माहिती असते. काम करत असताना तुम्हाला किती पुरस्कार मिळाले याच्यावर तुमचे काम दिसत नाही, तर सहकारी अधिकारी, कर्मचार्‍यांबरोबर समाजाने आपले केलेले विश्लेषण यावर ते अवलंबून असते. यामुळे चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. समाज, सहकारी अधिकारी, कर्मचारी यांना बरोबर घेऊन काम करण्याची प्रेरणा वडिलांकडून मिळाली आहे. आज त्याचा प्रत्यक्षात अधिकारी पदावर काम करताना उपयोग होत असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com