म्हातारपिंप्री ग्रामस्थांचे उपोषण

म्हातारपिंप्री ग्रामस्थांचे उपोषण

श्रीगोंदा | प्रतिनिधी

तालुक्यातील म्हातारपिंप्री येथील पाझर तलाव क्रमांक १ मध्ये कुकडी कॅनॉलचे पाणी सोडून सदरचा तलाव तातडीने पूर्ण क्षमतेने भरुन मिळावा यासाठी म्हातारपिंप्री ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयासमोर जनावरांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.

तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी मध्यस्थी केली. मात्र याबाबत जबाबदारी असणारे कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांनी वेळकाढूपणा केल्याने सरपंचासह ग्रामस्थ उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली .

म्हातारपिंप्री गावचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने कुकडीचे चालू आवर्तनात गाव तलाव भरून मिळण्यासाठी अनेक दिवसांपासून निवेदन दिले होते. गावातील तलावातील पाणीसाठा एप्रिल २०२१ मध्ये संपुष्टात आलेला आहे. गावाचे पिण्याचे पाण्याचा स्त्रोत याच पाझर तलावामध्ये आहे. सदर तलावामध्ये ग्रामपंचायत मालकीची विहीर असून सदर विहीरीवरुन पाईपलाईनव्दारे म्हातारपिंप्री गावठाण, स्टेशन, शेखवस्ती, हिरडेवस्ती, खानवस्ती, दलितवस्ती इ.भागात पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जातो.

परंतु एप्रिल २०२१ पासून सदर पाझर तलावात पाणी शिल्लक नाही. तसेच यावर्षी तालुक्यात पाऊस अत्यल्प प्रमाणात झालेला असल्याने मौजे म्हातारपिंप्री येथील पाझर तलाव क्रमांक १ मध्ये पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे यापुर्वी ग्रामपंचायतीचे वतीने मा.उपअभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग श्रीगोंदा यांचेकडे वारंवार पाठपुरावा करूनही चालूं आवर्तनमध्ये या तलावात पाणी सोडण्यात आले नसल्याने तहसिल कार्यलयासमोर सरपंच मनिषा ठोकळे, उपसरपंच माधुरी हिरडे यांच्यासह बापूराव हिरडे नवनाथ काळणे, शहजी हिरडे ,संजय पोकळे ,दत्तात्रय हिरडे रहेमान खान यांच्यासह गावकरी उपोषणाला बसले आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्याचे पती रमेश गिरमकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी केली.

Related Stories

No stories found.