
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर अत्यंत महत्वाचे समजले जाणारे पुणतांबा रेल्वे स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे, अशी खात्रीलायक माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर पुणतांबा रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळालेला आहे. विशेष म्हणजे दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर तसेच शिर्डीला जाण्यासाठी अनेक जलद गाड्या सुरू झालेल्या आहेत. मात्र या जलद गाड्यांना पुणतांबा रेल्वे स्थानकावर थांबा दिलेला नाही. जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी गेल्या 10 वर्षांपासून पुणतांबेकर प्रयत्न करत आहे. या मागणीसाठी त्यांनी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, रेल्वेचे सोलापूर विभागाचे महाप्रबंधक जनरल मॅनेजर तसेच खा. सदाशिव लोखंडे यांना प्रत्यक्ष शिष्टमंडळामार्फत भेटून मागणी केली. अनेक वेळा निवेदने दिली. त्याचा आतापर्यंत काहीही उपयोग झालेला नाही.
जलद गाड्यांना थांबा देण्यासाठी रेल्वे खाते तसेच रेल्वे बोर्डाने विशिष्ट नियमावली केलेली आहे. त्या स्थानकावरून दररोज किती प्रवासी जातात तसेच येतात याची सरासरी आकडेवारी गोळा केली जाते. संबंधित रेल्वे गाडीला थांबा दिल्यानंतर उत्पन्नात किती भर पडेल तसेच भविष्यात ते किती वाढू शकेल याचा अंदाज काढला जातो व नंतर धोरणात्मक निर्णय घेतला जातो. बर्याच जलद रेल्वे गाड्यांना अजूनही श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी येथे थांबा नाही. त्यामुळे पुणतांबा रेल्वे स्थानकाबाबत जलद गाड्यांना थांबा केव्हा मिळेल याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.
याच कारणामुळे पुणतांबा-रोटेगाव, तसेच कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. भविष्यात या रेल्वेमार्गाचा लवकर विचार होईल असे वाटत नाही. त्यामुळे पुणतांबा रेल्वे जंक्शनवर जलद गाड्यांना थांबा मिळावा ही पुणतांबेकरांची मागणी असली तरी 10 वर्ष होऊनही ती का पूर्ण होत नाही याचा सारासार विचार करण्याची गरज निर्माण झाली. सध्या पुणतांबा रेल्वे स्टेशनवर दोनच पैसेजर गाड्यांचे बुकींग होते. जलद गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी शिर्डीला जावे लागते. पुणतांबा गावाला तालुक्याचा दर्जा मिळाला तर मात्र यातील बरेच प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.