पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा हवालदिल

पिकांनी माना टाकल्या ; खरीप हंगाम धोक्यात येणार
पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा हवालदिल
संग्रहित

देवळाली प्रवरा (वार्ताहर) / Deolali Pravara - उन्हाचा पारा 40 अंशाला भिडत आहे. ढगांची गर्दी होत आहे. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होत आहेत. थोड्याच वेळात जोरदार पाऊस येईल, अशी स्थिती होत असताना पश्‍चिमेकडून पूर्वेकडे जोराचा वारा वाहण्यास सुरुवात होते व बघता बघता थोड्यावेळात ढग वितळून जातात आणि पुन्हा जैसे थी स्थिती निर्माण होते. असे रोज दुपारी होत आहे. मात्र, पाऊस काही पडत नाही. यामुळे बळीराजा (farmers) हवालदिल झाला आहे.

मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही सरासरीच्या 98 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याप्रमाणे यंदा वेळे आधी दोन दिवस मान्सून दाखल झाला. जून महिन्यात भरपूर पाऊस होईल, असे वाटत असल्याने मशागत करुन तयार झालेल्या रानात सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकर्‍यांनी कपाशी, सोयाबीन, बाजरी, मका, तूर, मूग, कडवळ आदी पिकांची पेरणी केली. अधूनमधून येणार्‍या रिमझिम पावसाने ही पिके उतरुन आली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत.

एखाद्या पावसाचा अपवाद वगळता संपूर्ण जून महिना कोरडाच गेला. आता जुलै सुरु झाला. परंतु जुलैची सुरुवात देखील निराशाजनकच झाली आहे. पिके पाण्यावर आली आहेत. आज पाऊस होईल, उद्या पाऊस होईल. या आशेवर शेतकरी जगत आहेत. परंतु रोज येणारा दिवस सारखाच येत आहे. पेरणीला महिना उलटून गेला आहे. तरी देखील पाहिजे असा दमदार पाऊस न झाल्याने खरिपाच्या पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. आठवडाभरात पाऊस न झाल्यास खरीप पिकांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार आहे.

रणरणत्या उन्हात रांगेत उभे राहून शेतकर्‍यांनी खरीप पिकासाठी बियाणे व खते विकत घेतली. पेरणी केली. पीक उतरून आलं आणि पावसाने दडी मारली. सततचा दुष्काळ, त्यानंतर झालेली अतिवृष्टी व आता सुरु असलेल्या करोना महामारीमुळे पडलेला लॉकडाऊन, उसाची न मिळालेली एफआरपी, इंधन दराने पार केलेली दरवाढ, आकाशाला भिडलेली महागाई या सर्वामुळे शेतीची पुरती वाट लागलेली असतांना लॉकडाऊन नंतर सर्व संकटावर मात करत पुन्हा पेरणी केली. पण नशीब तिथही आडव पडलं. निसर्गाने रंग दाखवयाला सुरुवात केल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com