देवळाली प्रवरा (वार्ताहर)-

दसरा गेला, दिवाळी गेली तरी देखील शेतकर्यांना अद्यापपर्यंत अतिवृष्टीचे पैसे न मिळाल्याने शेतकर्यांवर शिमगा करण्याची वेळ आली आहे.

आठ दिवसात शेतकर्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही तर सरकार विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील शेतकर्यांनी दिला आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने शेतकर्यांचे बाजरी, सोयाबीन, कपाशी, भुईमूग, मका आदी खरीप पिकांसह ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पिकात पावसाचे गुडघाभर पाणी साचल्याने पिके जागेवरच सडली होती. शेतकर्यांचे झालेले नुकसान बघण्यासाठी महाआघाडी सरकारचे मंत्र्यासह मुख्यमंत्रीही बाहेर पडले होते. या मंत्री महोदयांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन बाधीत पिकांची पाहणी करुन शेतकर्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या व आलेल्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी महाआघाडी सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

कोणत्याही शेतकर्याला वार्यावर न सोडता तातडीने शासकीय मदत दिली जाईल, अशी घोषणा दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी केली होती. सरकारच्या पाहणी पथका नंतर बाधीत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. सरकारच्या आदेशानुसार ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कृषीअधिकारी, कोतवाल यांनी शेतातील चिखल तुडवित रानोमाळ फिरत पिकांची पाहणी करुन तातडीने पंचनामे करुन बाधीत पिकाच्या क्षेत्राची आकडेवारी सरकारकडे पाठवून दिली. या सर्व कसरतीनंतर शासनाने शेतकर्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा केली व शेतकर्यांना नुकसान भरपाईचे पैसे दिवाळीपूर्वीच मिळतील, असे जाहिरपणे सांगितले. या घोषणेने बळीराजा सुखावला व त्याच्या आशा पल्लवित झाल्या.

ऐन सणासुदीच्या काळात हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला असला तरी सरकार मदतीला धावून आलयं! आता आपली दिवाळी नक्कीच गोड होणार, हे सुखी स्वप्न पाहत तो झोपी गेला. परंतु हे स्वप्नच राहीले. बँकेत चकरा मारुन, मारुन शेतकर्यांच्या चपला झिजल्या. रोज तेच तेच उत्तर देऊन बँकेचे अधिकारी वैतागले. अशा प्रकारे दिवाळी देखील गेली.परंतु शेतकर्यांच्या खात्यावर एक छदामही जमा झाला नाही.

गोड होणारी दिवाळी कडू झाली. सणाला नाट लागू नये म्हणून ज्वारी, बाजरीच्या कण्या भरडून त्या खाऊन सण साजरा करण्याची वाईट वेळ शेतकर्यांवर आली. आधीच घरात अठराविश्वे दारिद्रय असलेला बळीराजा यामुळे पूर्णपणे खचून गेला. दिवाळीला देखील पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील ना पीकविमा ना सरकारी मदत, त्यामुळे शेतकर्यांवर शिमगा करण्याची वेळ आली असून खरंच हे शेतकर्यांचे सरकार आहे का? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.

शासनाने आठ दिवसात अतिवृष्टीची रक्कम शेतकर्यांना न दिल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजेंद्र लोंढे, शहाजी कदम, सोपानराव शेटे, भगवानराव गडाख, दिलीपराव मुसमाडे, अर्जुनराव मुसमाडे, अशोकराव शेटे, गंगाधर खांदे आदींसह संतप्त शेतकर्यांनी दिला आहे.

शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी वेळ पडली तर कर्ज काढू, पण शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही, अशा वल्गना करणार्या महाआघाडी सरकारने शेतकर्यांची थट्टा केली आहे. दिवाळीच्या आगोदर निम्मे पैसे व दिवाळीनंतर निम्मे पैसे देण्याची घोषणा मंत्री वड्डेटीवार यांनी केली होती. अतिवृष्टीचा तर छदामही अद्याप मिळाला नाही. पण प्रधानमंत्री योजनेचे पैसे देखील मिळाले नाहीत. खरिपाची पुरती वाट लागलेली असतांना शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे. पण खिसा रिकामा असल्याने व दोन लाखाच्यावर कर्जमाफी न मिळाल्याने बँका दारात उभे करीनात. ठिबक सिंचन योजना अद्याप बंद असल्याने अनेक शेतकर्यांच्या फाईली पूर्व संमत्तीसाठी लालफितीत अडकून पडल्या आहेत. अशी वाईट अवस्था बळिराजाची झाली असताना सरकार मात्र, राजकिय कुरघुड्यात दंग असल्याचे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी म्हटले आहे.