शेतकर्‍यांना मान्सूनपूर्व पावसाची प्रतिक्षा

शेतकर्‍यांना मान्सूनपूर्व पावसाची प्रतिक्षा

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

जून सुरु होवून 15 दिवस झाले, रोहिणी गेले आता मृगही कोरडेच चालले. अजून मशागती नाहीत, मान्सूनपूर्व पावसाची प्रतिक्षा शेतकरी वर्गाला आहे. मान्सून अजूनही आठ दिवस लांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

वळवाचा पाऊस यंदा नगर जिल्ह्यात सर्वत्र सारखा न होता. ठिकठिकाणी झाला. राहाता तालुक्यात मात्र काही ठिकाणी फक्त काहीशी बुरबूर झाली. खरेतर वळवाच्या पावसावर शेतकरी पेरणीपूर्व मशागती करतात. परंतु तो पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. दिवसभर पावसाळी वातावरण असते, परंतु पाऊस होत नाही. मार्चमध्ये खरीपातील पिके निघतात. एप्रिलमध्ये शेताची नांगरणी होते. मेमध्ये वळवाचा पाऊस पडतो. त्यामुळे या पावसाने नांगरलेल्या शेतातील ढेकळे मऊ होतात. शेतकरी पेरणीपूर्व मशागती करता येतात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने पेरण्या करता येतात. असे शेतकर्‍यांचे वेळापत्रक असते. वळवाचा पाऊस मशागतीसाठी महत्वाचा मानला जातो. वळवाच्या पावसावर मशागती केलेल्या शेतातील तण अंकुरतात. जूनमध्ये पेरणी करतांना हे अकुरलेले तण मोडतात.

यंदा वळवाच्या पावसाचे प्रमाण खास नाही. सुसाट वेगाने ढग पुढे जातात. पुढे पुढे मार्गक्रमण करतात. हवेच्या दाबात अचानक फरक झाला तरच तो बरसतो. म्हणजेच तो मागे वळतो म्हणून तो वळवाचा पाऊस! मान्सून यंदा काहीसा उशीराने सुरु होणार आहे. सलग तीन दिवस 25 मिमी किंवा त्याहुन अधिक पाऊस पडला तरच हवामान खाते त्या पावसाला मान्सून आल्याचे जाहीर करते. यंदा मान्सूनची प्रतिक्षाही लांबली आहे. हे चिंतेत भर घालणारे आहे.

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आठ दिवसांपूर्वी मध्यम स्वरुपात बरसला. आता धरणांच्या पाणलोटालाही पावसाची प्रतिक्षा आहे.

काल सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासात दारणाच्या पाणलोटातील घोटी येथे 1 मिमी (146 मिमी), भावली 8 मिमी (358 मिमी) असा किरकोळ पाउस नोंदला गेला. अन्यत्र चार पाच दिवसांपासून पाऊस नाही. 1 जूनपासून 15 दिवसात दारणा 57 मिमी, गंगापूर 135 मिमी, मुकणे 70 मिमी असे पाऊस नोंदले गेले. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील ब्राम्हणगावला 48 मिमी, कोपरगावला 87 मिमी, पढेगाव 33, सोमठाणा 18, कोळगाव 25, सोनेवाडी 28, शिर्डी 22, राहाता 23, रांजणगाव 25, चितळी 12 हा 1 जून पासुनचा पाऊस आहे.

आठ दिवसांपुर्वी कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकरी दाखल होत होते. काहींनी बियाणेही खरेदी केले पण आता बियाणे खरेदी पावसाअभावी थंडावली आहे.

- साहेबराव बावके, बियाणे विक्रेते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com