अस्तगाव (वार्ताहर) -

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील उभी पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. या पिकांसाठी उन्हाळी आवर्तनाकडे

शेतकर्यांचे नजरा खिळल्या आहेत. लोकप्रतिनिधी हे आवर्तन घेण्यासाठी कधी आग्रह धरणार याकडे कोपरगाव तसेच राहाता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासुन तीव्र उन्हाळा जाणवत आहे. त्यातच लाभक्षेत्रातील इंधन विहीरी अथवा विहीरींचे पाणी कमी झाले आहे. त्यातच विजही टिकत नाही. अनेक ठिकाणी विजेचे रोहित्र बिलाअभावी बंद करण्यात आले आहेत. या कारणांनी शेतातील उभी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. करोनाचे संकट आणि उभ्या पिकांना पाण्याची गरज यामुळे शेतकरी गोदावरी कालव्यांच्या आवर्तनाची चातकासारखी वाट पाहत आहे. या अगोदरचे आवर्तन 20 मार्चला बंद झाल्याचे जलसंपदा विभाग सांगते. त्यामुळे येते आवर्तन कधी सुटणार व कसे नियोजन होणार याकडे लक्ष लागुन आहे.

दरम्यान एप्रिलच्या सुरुवातील एक व मे च्या मध्यावर अजुन एक असे दोन आवर्तन होतील का? जलसंपदा विभाग दोन आवर्तने गोदावरीच्या लाभक्षेत्रासाठी देतील का याकडे लाभक्षेत्रातील शेतकर्यांचे लक्ष लागुन आहे. कारण गोदावरीच्या दोन्ही कालव्यांवर एकूण 3 हजार हेक्टर क्षेत्रावर पिके उभी आहेत. ऊस, काही ठिकाणी फळबागा व चारा पिके उभी आहेत. त्यामुळे एका आवर्तनासाठी दोन टिएमसी पाणी गृहीत धरले तरी चार टिएमसी पाणी दोन आवर्तनासाठी लागु शकते. त्यात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनाचे आवर्तन होणार असल्याने पाण्याची बचत होईल. उन्हाळी आवर्तन असल्याने कदाचित पाण्याचा वापर कमी जास्त प्रमाणात होईल. पण दोन हंगामाचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

जलद कालव्याला

5 ला पाणी सुटणार

दरम्यान नांदूर मधमेश्वर बंधार्यातून वैजापूरच्या दिशेने वाहाणारा जलद कालव्यासाठी 5 एप्रिलला उन्हाळी आवर्तनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. 1.4 टिएमसी पाणी जलद कालव्याला उन्हाळी आवर्तनासाठी देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तसेच सिंचनासाठी जलद कालव्यातून पाणी देण्यात येणार आहे. वैजापूर तालुक्यातील 49 गावे, गंगापूर तालुक्यातील 46 व कोपरगाव तालुक्यातील काही गावांना याचा फायदा होणार आहे. 24 दिवसांचे त्या कालव्याचे आवर्तन असणार आहे. नांदुर मधमेश्वर बंधार्याीत 257 पैकी 204 दलघफू पाणीसाठा आहे. त्यामुळे 5 एप्रिलला या बंधार्यातून पाणी सुटणार आहे. तर धरणातुन येत्या एक दोन दिवसात बंधार्याच्या दिशेने पाणी सोडण्यात येणार आहे.

जलद कालव्याला नांदूरमधमेश्वर बंधार्यातुन 5 एप्रिल ला पाणी सुटणार आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना 10 एप्रिलला पाणी सोडले जावु शकते. हे पाणी अर्थात एप्रिल च्या दुसर्या आठवड्यात लाभक्षेत्रात पोहचणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असेल, त्यानंतर सिंचनासाठी पाणी पायथा ते माथा असे असेल. अर्थात लोकप्रतिनिधी या आवर्तनासाठी कधी आग्रह धरतात त्यावरच या कालव्यांच्या आवर्तनाचे तारीख ठरणार आहे.

काल सकाळी 6 चे धरणाचे साठे असे- दारणा 4.8 टिएमसी (67.69 टक्के), गंगापूर 2.6 टिएमसी (46.21 टक्के), भावली 1.1 टिएमसी (77.21 टक्के), मुकणे 4.5 टिएमसी (62.43 टक्के), कडवा 439 दलघफू (26 टक्के), वालदेवी 947 दलघफू (83.62 टक्के).

पाणी वाचवा,

आवर्तन वाढवा!

दारणा समुहात आज जवळपास 13 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 400 दलघफुटाने जादा आहे.

जलद कालवा व गोदावरी कालव्यांचे संयुक्त आवर्तन नियोजित करून त्यायोगे वाढीव वहन व्यय कमी होऊ शकतो. सध्या रब्बी हंगामातील पिके बहुतांशी निघालेली आहेत. फळबागाखालील क्षेत्रही कमी होत आहे. त्यामुळे पाणी मागणीमध्ये उस हेच प्रमुख पिक आहे.

उन्हाळ्यातील अवैध पाणी उपशावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून त्याद्वारे पाणी बचत होऊ शकते. उपलब्ध असलेल्या पाण्यातून, मागणी क्षेत्राप्रमाणे लागणारे पाणी, जलद कालव्याचे पाणी, बिगर सिंचनासाठीची 15 जुलैअखेरची तरतुद, बाष्पीभवन या सर्व घटकांचा सुयोग्य संतुलन ठेऊन कार्यक्षम नियोजन होणे अपेक्षित आहे.

सध्या वाढलेले तापमान व पुढील काळात येणार्या उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा अंदाज याचाही विचार होणे आवश्यक आहे. पुढील एप्रिल व मे महिन्यात वाढते तापमान राहिले तर पिकाला दोन पाण्याची गरच लागु शकते. या सर्व शक्याशक्यतांची दखल आवर्तन नियोजनात होणे अपेक्षित आहे.

आवर्तनात सध्या होत असलेला पाणी वापर हा अतिरिक्त असुन त्यावर प्रभावी नियंत्रण आवश्यक आहे. आवर्तनात अतिरिक्त पाणी सोडून आवर्तन यशस्वी करणे हा उद्देश सिंचन व्यवस्थापनात अपेक्षित नसावा. आपल्याला आवर्तन नव्हे, तर हंगाम (पर्यायाने पिक) यशस्वी करावयाचा आहे, हे तत्व कसोशीने पाळणे गरजेचे आहे. आवर्तनात सुनिश्चित सुत्रापेक्षा किती पाणी अतिरिक्त दिले जाते, त्यावरच पुढील काळात किती आवर्तने होतील, हे आपोआप ठरते आणि आवर्तनाच्या संख्येवर पिकांचे भवितव्य! त्यामुळे विहीत पाणी आणि त्यात भिजवावयाचे विहीत क्षेत्र, यासाठी शासनाने निश्चित केलेल्या सुत्रापेक्षा, आवर्तनात होणार्या अतिरिक्त पाणी वापरावर काटेकोर बंधन आणणे गरजेचे आहे. अन्यथा प्रत्येक आवर्तनात अतिरिक्त पाणी वापर होत राहीला तर, भविष्यात आवर्तनातील संख्या कमी होईल, हे कुणी वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचा परिणाम म्हणून ऐन मे महिन्यातच धरणाची पातळी तळ गाठते आणि पाणी संपले म्हणून हात वर केले जातात. त्यामुळे 15 आक्टोबर ते 30 जुनपर्यंतचा सिंचन कार्यक्रम एकात्मिक स्वरुपात आणि हंगाम यशस्वी करावयाचा आहे, आवर्तन नव्हे, ही खुणगाठ मनात ठेवून राबविला पाहिजे.

पाणी पट्टी कमी करा!

सध्या वाढीव पाणी पट्टी मुळे शेतकरी पाणी पट्टी व अर्जही भरत नाहीत. सध्याच्या परिस्थितीत आवर्तनाची संख्या घटली आहे. या पार्श्वभुमिवर वाढलेली पाणी पट्टी कमी करुन लाभधारकांना दिलासा द्यावा.

- तुषार विव्दांस, शेतकरी, ब्राम्हणगाव

रब्बी हंगामात नियोजनापेक्षा झालेला कमी पाणी वापर आणि सध्याचे उपलब्ध पाणीसाठे विचारात घेऊन पुर्व नियोजित कार्यक्रमाचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी लाभधारकातुन होत आहे.

- उत्तमराव निर्मळ