शेवगाव येथे चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी

विविध शेतकरी संघटना, पक्षांकडून तहसील कार्यालयावर आंदोलन
शेवगाव येथे चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

उसाची एफआरपी, पाऊस नुकसान यासह विविध विषयांवरून तालुक्यातील विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने आज (दि.24) शेवगाव तहसील कार्यालय येथे दिवाळीच्या दिवशी चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली.

यंदाच्या गळीत हंगामात एफआरपी चे तुकडे करून ऊस भाव देण्याचा झालेला अन्यायकारक निर्णय शेतकर्‍यांना परवडण्यासारखा नाही. ऊस उत्पादनाचा वाढता खर्च लक्षात घेता परिसरातील साखर करखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक तीनशे पन्नास रुपये प्रति टन भाव देण्याचा निर्णय जाहीर करावा, मागील 2020 - 21 हंगामासाठी एफआरपी रकमेच्या फरकातून काही कारखान्यांनी ठेव म्हणून कपात केलेली अन्यायकारक रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करावी, मागील हंगामात ऊस तोडणीसाठी शेतकर्‍यांना द्यावी लागलेली रक्कम संबंधित शेतकर्‍यांना परत मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, स्वाभिमानि शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब लवांडे, दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगरे, आम आदमी पार्टीचे शरद शिंदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव कॉ.सुभाष लांडे, कॉ.संजय नांगरे, बबनराव पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश रांधवणे, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश मगरे, राजेंद्र घनवट, डॉ.दादासाहेब काकडे, रमेश कचरे, शरद मरकड, अमोल देवढे, माजी जि.प. सदस्य रामजी साळवे उपस्थित होते. यावेळी विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचा आढावा घेतला.

तालुक्याच्या विविध भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे तालुक्यातील विविध मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे विविध पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेती व शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनाबाबत दिलेल्या निवेदनाचे उत्तर प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यानी आंदोलनकर्त्या संघटना प्रमुखांकडे पाठविले मात्र त्याबाबत विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नापसंती व्यक्त करून या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवीला त्यानंतर प्रादेशिक सहसंचालक भालेराव यांच्यासह परिसरातील विविध साखर कारखाना प्रतिनिधी यांच्यासमवेत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

शेतकर्‍यांच्या जीवन मरणाच्या समस्यांच्या पाठपुराव्यासाठी पुकारण्यात आलेले हे शेतकरी आंदोलन आर पारची लढाई असून आता नाही तर कधीच नाही या न्यायाने शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा निर्णय संबंधितांकडून जाहीर झाला नाही तर या पुढील काळात आंदोलनाची धग वाढवून शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com