लोणीत विद्युत पंपाच्या केबल चोरीने शेतकरी हवालदिल

लोणीत विद्युत पंपाच्या केबल चोरीने शेतकरी हवालदिल

लोणी (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील शेती पंपाच्या केबल चोरीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महावितरणची थकबाकी वसुली मोहीम, विजेचा खेळखंडोबा अशा अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ अन्नदात्यावर आली आहे.

लोणी बुद्रुक गावातील म्हस्के वस्ती आणि चर भागातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल अज्ञातांनी चोरून नेल्याच्या घटना गेल्या आठवडाभरापासून घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या आणि नव्याने पेरणी केलेल्या पिकांना पाणी देण्यास अडचणी येत आहेत. आर्थिक नुकसान सहन करूनही पुन्हा केबलची कधी चोरी होईल याची खात्री नसल्याने शेतकरी मानसिक तणावात आहेत.

लोणी बुद्रुक येथील रविकिरण नंदकिशोर राठी, ज्ञानेश्वर विठ्ठल विखे, विलास ज्ञानेश्वर विखे, गोकुळ गंगाधर विखे आदी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या. काही केबल विहिरीत अर्धवट तुटल्या तर काही विद्युत पंपांपासून तुटल्या. त्यामुळे आर्थिक नुकसान तर झालेच पण विहिरीतील पानबुडी पंप बाहेर काढून पुन्हा विहिरीत सोडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यामुळे शेतकरी तणावात आहेत.

रविकिरण राठी व शेतकऱ्यांनी लोणी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी तात्काळ दखल घेत त्या भागात जाऊन पाहणी केली. पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. या चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या महावितरण वीज थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित आहे तर विजेचा पुरवठाही सुरळीत नसल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com