
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोणते आंदोलन कशा पद्धतीने सुरू करावयाचे या विषयावर चर्चा करण्यासाठी पुणतांबा येथे आज सोमवार दिनांक 23 मे रोजी सकाळी 10 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेत शेतकरी आंदोलनाबाबत नेमके काय निर्णय घेतले जातात याकडे परिसराचे लक्ष लागून आहे.
19 मे रोजी पुणतांबा येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. त्यात शेतकर्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यासाठी 23 मे रोजी ग्रामसभा बोलाविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता. अतिरिक्त उसाचा प्रश्न, त्याला देण्यात येणारी नुकसान भरपाई, कांदा तसेच दुधाला हमीभाव द्यावा, घटनेतील परिशिष्ट 9 कलम रद्द करावे, दिवसा नियमित विद्युत पुरवठा करण्यात यावा यासह अनेक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
पुणतांब्यातील शेतकर्यांनी 1 जून 2017 मध्ये शेतकरी संपाचे अनेक आंदोलन केले होते. त्याला राज्यभर प्रतिसाद मिळाला होता. मात्र या आंदोलनाची घोषणा मार्च 2017 मध्ये केली होती. आंदोलन यशस्वी करण्यासाठी किसान क्रांती व इतर नेत्यांनी राज्यभर दौरे करून शेतकरी नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आंदोलनासाठी वातावरण तयार केले होते. 1 जून रोजी सुरु झालेल्या आंदोलनात तिसर्या दिवशीच फूट पडली होती. नंतर एका गटाने काही दिवस आंदोलन सुरू ठेवले होते. काही मागण्या मान्य झाल्यानंतर तेही आंदोलन मागे घेण्यात आले. नंतर काही शेतकरी नेत्यांनी हे आंदोलन हायजॅक केले व आपली पोळी भाजून घेतली.
2017 नंतर काही कृषीकन्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाचे आंदोलन केले होते. मात्र सरकारने हे आंदोलनही मोडित काढले होते. असे असताना पाच वर्षांनंतर पुणतांबेकर पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. मात्र हा निर्णय घाईघाईने घेतला जातो की काय? अशी शेतकरी वर्गामध्ये चर्चा आहे. कारण मान्सून 10 दिवस आगोदर दाखल होणार असून शेतकरी वर्ग सध्या शेतीच्या मशागतीत गुंतला आहे.
पाऊस पडल्यावर पेरणीचा हंगाम सुरू होणार आहे. त्यातच 31 मे पर्यंत साखर कारखाने सुरू राहणार असून अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिल्लक उसासाठी राज्य सरकारने अनुदानाची घोषणा केली आहे. शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न जटील आहे. आंदोलन केले तर शासन समितीची स्थापना करून मूळ प्रश्नाला बगल देत असते. अशा परिस्थितीत आंदोलन उभे करणे व दीर्घकाळ चालविणे हे सोपे नसते. त्यासाठी पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आंदोलन डोळ्यासमोर ठेवावे लागते. पुणतांबा परिसरातील शेतकरी वर्गाला तेवढी मानसिकता ठेवावी लागेल. तरच शासन आंदोलनाची दखल घेईल. या सर्व घटकाचा विचार आजच्या ग्रामसभेत करून निर्णय घेण्याची शक्यता आहे.
पुणतांबा गावची लोकसंख्या 20 हजारांच्या दरम्यान आहे. 80 टक्के शेतकरी आहेत. तसेच शेजारील 11 गावांतील लोकसंख्या 50 हजारांच्या पुढे आहे. शेतकर्यांच्या संवेदनशील प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिले तर आंदोलनास बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.