देवळाली प्रवरात खतासाठी शेतकर्‍यांच्या रांगा

देवळाली प्रवरात खतासाठी शेतकर्‍यांच्या रांगा

देवळाली प्रवरा (वार्ताहर) / Deolali Pravara - देवळाली प्रवरा येथे युरिया खत आल्याचे समजताच महिला व पुरुष शेतकर्‍यांनी खत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकर्‍यांनी मका, कपाशी, सोयाबीन, आदी पिकांची पेरणी केली आहे. या पिकासाठी सध्या युरिया खताची आवश्यकता आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून बाजारात युरिया खताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. काल देवळाली प्रवरा सोसायटीमध्ये 40 टन, बागाईत व एका कृषीसेवा केंद्रा मध्ये 15 टन युरिया आल्याचे समजताच शेतकर्‍यांच्या खत घेण्यासाठी रांगा लागल्या. या अगोदर बागाईत पीक सोसायटीमध्ये 20 टन युरिया आली होती.

या ठिकाणी देखील युरिया घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. प्रत्येक शेतकर्‍याला दोन गोण्या मिळत असल्याने नंबर लावण्यासाठी व जास्त गोण्या मिळण्यासाठी कुटुंबातील महिला सदस्यांनाही सोबत आणले होते. दोघे रांगेत असल्याने दोघांनाही खत मिळत होते. खत घेण्यासाठी स्थानिकांपेक्षा गावाबाहेरील चिंचविहीरे, कणगर, ताहाराबाद, वरशिंदे, लाख, जातप, त्रिंबकपूर, टाकळीमिया, गुहासह आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे संस्थेच्या सभासदांवर अन्याय होत असून आधी सभासदांना वाटप करण्यात यावे, नंतर बाहेरगावच्या लोकांना वाटप करावे, अशी तक्रार सभासदांनी केली आहे.

दरम्यान, नॅनो युरिया लवकरच बाजारात येणार आहे. यामुळे युरियाचा तुटवडा संपणार आहे. ही युरिया द्रव स्वरुपात असून एक लिटरच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. याची किंमत 240 रुपये असून एकरी एक लिटर फवारणीची मात्रा देण्यात आली आहे.

ऐन पावसाळ्यात युरिया खताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे या खताचा काळाबाजार सुरु झाला आहे. शेतकर्‍यांच्या नावाखाली काही महाभाग रांगेत उभे राहून खत घेत आहेत व चढ्याभावाने बाहेर विकत आहेत. याला आळा बसण्यासाठी आधार कार्ड सोबत सात-बारा उतारा असल्याशिवाय संबंधितांना खते देऊ नयेत तसेच सभासदांना पहिले प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी संस्थेचे सभासद व स्थानिकांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com