माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथे शेतकर्यांना गंडा घालून कुटुंबियासह पोबारा केलेल्या किराणा,

भुसार व्यापारी मुथ्था बंधुच्या बंद दुकानासमोर आजही बाहेर गांवच्या शेतकर्यांची गर्दी केली होती. घेणे असलेल्या शेकडो शेतकर्यांनी यादीत नांवे नोंद केली असून बँक व्यापारी घेणेदारा व्यतिरीक्त निव्वळ शेतकर्यांचा आकडा अंदाजे 25 कोटीपर्यत जाण्याची शक्यता असून या सर्व शेतकर्यांनी आज श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली; परंतू पोलीस अधिकार्यांनी अर्ज दाखल करून घेत जलद गतीने तपास करण्याचे आश्वासन दिले.

चाळीसगांव अन् सोयगाव तालुका हद्दीवरील नागद (ता.सोयगांव) या स्वत:चे गावांत कापूस उत्पादक शेतकर्यांचे पैसे बुडवून माळवाडगांवात बस्तान बसवून किराणा भुसार मालात सिझनला दिवसाला वीस लाखांवर उलाढाल करणार्या रमेश रामलाल मुथ्था व गणेश रामलाल मुथ्था या बंधूंनी कुटुंबातील दहा सदस्यासह शनिवारी मध्यरात्री नियोजनबद्ध पलायन केले. पहिल्या दिवशी स्थानिक शेतकर्यांनी तोबा गर्दी केली.

दुसर्या दिवशी ही बातमी परिसरातील गावागावात पसरताच आजही बाहेर गांवच्या शेतकर्यांनी गर्दी करून यादीत नांवे नोंदवली. यावर्षी स़ोयाबीनचे भरमसाठ उत्पन्न निघाल्याने मुथ्थाने विक्रमी नव्याने माल खरेदी केली होती. चालू हंगामात खरेदी केलेल्या सोयाबीनचा शेतकर्यांचा पट्टी घेण्याचा जेवढा आकडा निघतो तेवढाच आकडा ठेव पट्टीस महिन्यास दोन टक्के व्याजाचे आमिष केलेल्या शेतकर्यांचाही असून दोन्ही मिळून आजचा अंदाजीत आकडा 25 कोटीच्यावर जातो आहे.

या प्रकरणामुळे गावातील शेतकरी हतबल झाले असून मोलमजुरी करणारे गोरगरीब शेतकळर्यापासून बडा बागायतदार वर्गही यामध्ये गुंतलेला असून, मुथ्था यांस पकडण्यासाठी मिळेल ते चेक, पावत्या असे भक्कम पुरावे पोलीस ठाण्यात जाऊन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक मसुद खान यांच्याकडे सुपूर्द करत साहेब लवकरात लवकर शोध घ्या अशी मागणी करत आहे.

सोयाबीन तारण माल घोटाळ्यात मुथ्था अडकल्याने निघणार होते वॉरंट

श्रीरामपुरमधील एका संस्थेच्या सोयाबीन तारण मालात तब्बल चार ट्रकचा ठपका रमेश मुथ्था बंधुसह गोडावून रखवालदार यांच्यावर ठेवण्यात येऊन दोघांनाही संस्थेने नोटीस बजावले ह़ोते. ही भरपाई केली नाही तर पोलीस केस करून वॉरंट काढण्याची तंबी दिल्या नंतर मुथ्था चार ऐवजी दोन ट्रकची 14 लाख रूपयांची भरपाई करण्यास तयार झाला ह़ोता. परंतू आज माझ्याकडे पैसे नाहीत माझ्या नावावर कर्ज वाढवून देऊन ही रक्कम वसूल करावी अशी अट घातली होती. गोडावून रखवालदार हा प्रकरण मिटवून घेण्यासाठी मुथ्था यांचे निवासस्थानी विनंती करण्यासाठी आला होता. माझे संस्थेच्या पदाधिकार्यांशी चांगले संबंध असून मला या नोटीशीतून मुक्त करा अशी सारखी विनंती करत असल्याची तब्बल तीस मिनिटांची गोपनीय क्लिप शेतकर्यांनी तालुका पोलिसांकडे सुपूर्द केली. ती वार्ताहरांना ही प्राप्त झाल्याने हे भांडे फुटले; मात्र हे प्रकरण मिटविण्यासाठी वॉरंट निघू नये म्हणून मुथ्थाने चार ट्रकचे पैसे भरून प्रकरण न मिटविता पोबारा का केला हे गुलदस्त्यातच आहे.