शेतकर्‍याने पेटविला कांदा

शेतकर्‍याने पेटविला कांदा

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यामध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात काढलेला कांदा भिजल्याने संपूर्ण कांदा हा सडून गेला. तरी देखील शासनाने काढलेल्या कांद्याचे पंचनामे न केल्याने तो कांदा सडू लागल्याने मानोरी येथील शेतकर्‍याने नैराश्यातून या कांद्याची होळी करून शेतकर्‍यांने शासन विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील शेतकरी अमोल विलास भिंगारे या शेतकर्‍याने तीन एकर उन्हाळी कांद्याचे पीक घेतले होते. मशागती पासूनच त्यांनी कांदा पीकाची काळजी घेतली. सुरवातीला दर्जेदार बियाणापासून रोपे तयार करून त्या रोपांची आपल्या शेतात मजूरांकडून लागवड केली. रासायनिक खते, महागडी औषधांची फवारणी व कांद्यातील खुरपणीसाठी वारेमाप खर्च केला. त्यामुळे कांदा पिक जोमदार आले. कांदा काढणीस आल्याने त्यांनी मजुरांना वाढीव मजूरी देऊन कांदा काढला. त्या कांद्याच्या शेतातच पोळी घालून तो कांद्याच्या पातीखाली झाकून ठेवला.

मात्र, दुर्दैवाने राहुरी तालुक्यात मागील महिन्यात अचानक अवकाळी पावसाने तांडव केल्याने शेतात असलेला त्यांचा हा कांदा भिजला. त्यानंतर त्यांनी हा कांदा उन्हात सुकविण्यासाठी ठेवला. अवकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर उशिरा जाग आलेल्या शासनाने पंचनाम्यांचा ‘फार्स’ सुरू केला. आता आपल्याही कांद्याचा पंचनामा होईल या आशेने भिंगारे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. शासकीय आधिकारी शिवारात पंचनामे करीत असताना भिंगारे यांनी आपल्याही कांद्याचा पंचनामा करा, अशी त्यांना विनवणी केली.

मात्र, आम्हाला फक्त शेतात उभ्या असलेल्या पिकांचेच पंचनामे करण्याचे वरून आदेश असल्याचे सांगितले. त्यानंतर भिंगारे यांना हा भिजलेला कांदा फार काळ टिकणार नाही याचा अंदाज आल्याने तसेच कांद्याला वास सुटल्याने त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला. त्यांनी मजुरांना बोलवून कांदा गोण्यामध्ये भरण्यास सुरूवात केली असता जवळपास 90 टक्के कांदा सडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फक्त 10 टक्केच कांदा सुस्थितीत असल्यामुळे ते पूणर्र्पणे हताश झाले. तीन एकराचा हा कांदा शेतातून बाहेर कसा काढायचा हा प्रश्न त्यांना पडला. कांद्याला भाव नाही, तीन एकर कांद्यासाठी आता पर्यंत जवळपास दोन लाख रूपये खर्च झाला. यातून त्यांनी नैराश्यातून कांद्याच्य पोळी पेटवून देऊन शासनाचा निषेध केला.

शेतात कांदा असतांना अवकाळी पाऊस झाल्याने कांद्याच्या गाभ्यात पाणी गेल्याने हा कांदा जागेवरच ‘बस्ट’ झाला आहे. तर काही जागेवरच सडला आहे.असा कांदा भुसार्‍यात भरण्यासाठी योग्य नसल्याने मिळेल त्या भावात म्हणजे पाच ते सहा रुपये किलोने विकला जात आहे. परंतू, हा कांदा व्यापार्‍यांनी खरेदी केल्यानंतर सडत असल्याने कांद्याचे भाव पडले असल्याचे सांगीतले जात आहे. नाफेडची खरेदी सुरु झाल्यानंतर भाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नाफेडने कांदा खरेदी करावा, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com