शेतकरी अडचणीत असल्याने कांदा निर्यात वाढवावी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
शेतकरी अडचणीत असल्याने कांदा निर्यात वाढवावी

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

बाजार समितीमधील आवक वाढल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याला परदेशात जास्त भाव मिळत असल्याने केंद्र सरकारने निर्यात वाढवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केंद्र सरकारकडे मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावर्षी शेतकर्‍यांनी गहू पेरणी करण्यापेक्षा कांदा या पिकामध्ये जास्त उत्पादन मिळेल, या आशेने कांदा उत्पादन घेण्यासाठी भर दिला आहे. कांदा लागवडीच्या सुरुवातीला 30 रुपये प्रति किलो दर मिळत होता. परंतु कांदा काढणीला येईपर्यंत दहा रुपये पेक्षाही खाली दर आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. कांद्याचा उत्पादन खर्च वाढल्याने कांदा लागवडीसाठी दहा हजार रुपये खर्च येत आहे. तसेच डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नांगरट, रोटा यांचाही खर्च वाढला, त्यातच कांद्याला औषधाचा खर्च मोठ्या प्रमाणात झाला.

यावर्षी औषधाच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने न्याय देण्याची गरज आहे. तसेच 2022 मध्ये शेतकर्‍यांचे उत्पादन दुप्पट करू असे आश्वासन केंद्र सरकारने वारंवार दिलेले आहे तरी आता परदेशामध्ये कांदा या पिकाला चांगली मागणी असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्यात चालू करावी, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com