‘ग्रीनफिल्ड’ हायवेच्या भूसंपादनावर राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्षेप

१९ गावांतून ६०० तक्रारी दाखल; राहुरीत हायवेला बसणार कोलदांडा ?
‘ग्रीनफिल्ड’ हायवेच्या भूसंपादनावर राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्षेप

राहुरी (प्रतिनिधी)

नाशिक -नगर-सोलापूर ग्रीनफिल्ड हायवे आता राहुरी तालुक्यात वादग्रस्त ठरण्याच्या मार्गावर आहे. या हायवेसाठी राहुरीतील १९ गावांतून तब्बल ६०० शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. त्यामुळे या हायवेला राहुरी तालुक्यात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडूनच कोलदांडा बसणार असल्याचे संकेत आहेत.

राहुरी येथे तक्रार कक्ष स्थापन केल्यानंतर १९ गावातून अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला आहे. भूसंपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचा कवडीमोल मोबदला मिळणार असल्याने शेतकरी संतप्त झाले असून समृद्धी महामार्गाच्या तत्वावर मोबदला देण्याची मागणी बहुतांशी शेतकऱ्यांनी केली आहे.

सुरत-हैदराबाद या महत्त्वाकांक्षी सहापदरी ग्रीनफिल्ड हायवेमधील भूसंपादनाबाबत राहुरी तालुक्यातील १९ गावांतून ६०० हरकती शेतकऱ्यांनी दाखल केल्या आहेत. हरकतींना २१ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत असून आता केवळ हरकती दाखल करण्यासाठी चोवीस तासच शेतकऱ्यांच्या हातात राहिल्याने तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.

राहुरी तालुक्यातील ४४ किलोमीटरमधील ५३० सर्व्हेतून शेतकऱ्यांच्या बागायती जमीन जाणार आहेत. दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरत - नाशिक - अहमदनगर या सहापदरी (नंतर आठपदरी) ग्रीनफिल्ड हायवेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात संबंधितांना दि. २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती मागविल्या आहेत.

या अधिसूचनेत भूसंपादनासाठी हस्तांतरण करण्यात येणाऱ्या गावातील सर्वेनंबर प्रसिद्ध झाल्याने संबंधित शेतकरी व सर्वेनंबरमधील ग्रामस्थांनी हरकतीसाठी संबंधित कार्यालयाकडे धाव घेतली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिकाधिक स्तरावर तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार प्रांताधिकारी व सक्षम अधिकारी (भूसंपादन) अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहरीचे राहुरीचे तहसीलदार यांनी स्वतंत्र कक्ष तयार केला आहे.

गुरुवारी उशिरापर्यंत या विशेष कक्षात राहुरी तालुक्यातून सुमारे ६०० हरकती दाखल झाल्या आहेत. दाखल करण्यात आलेल्या हरकर्तीमध्ये बागायती जमिनींना देण्यात येणारा मोबदला समृद्धी महामार्गाच्या तत्त्वांवर देण्यात यावा, या हायवेलगत दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्यात यावा, गुगल मॅप व प्रसिद्ध झालेले सर्वेनंबर यात मोठ्या प्रमाणात विसंगती व तफावत आहे, अनेक सर्वेनंबरमधील शेतकऱ्यांचे स्थानिक व कौटुंबिक वाद आहेत. विहिरी, झाडे, गायीचे गोठे, रस्ते वहिवाट या व अन्य बाबींवर शेतकऱ्यांनी हरकती व आक्षेप नोंदविला आहे.

राहरी तालुक्यातील १९ गावांतील ४४ किलोमीटर अंतरातील (कि.मी. २४९ ते कि.मी. २९२) ४२८ हेक्टर क्षेत्रांचे हायवेसाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्यामध्ये राहुरी शहरातील ३६ सर्वेनंबरचे क्षेत्र, चिंचविहिरे ७, धानोरे ६, डिग्रस १५, कानडगाव ३३, कनगर ६५, खडांबे ३५, माळेवाडी- डुकरेवाडी ५६, मल्हारवाडी २, मोमीन आखाडा ३०, राहुरी खुर्द १४, तांदुळनेर सडे ३१, सोनगाव ६४, वडनेर ८, तांभेरे ३५, तांदूळनेर २३, वांबोरी येथील सर्वाधिक ६६ सर्वेनंबरमधील जमिनींच्या क्षेत्रांचे एनचएआय प्रतिनिधी, स्थानिक तलाठी, सिटीसर्व्हे व महसूल यांच्या उपस्थितीत मोजणी करून भूसंपादन केले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड हायवेबाबत एनएचएआयने पुढाकार घेऊन हायवेत जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी व माहिती घेऊन समृद्धी महामार्ग तत्वानुसार मोबदल्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com